नाशिक : महान्यूज लाईव्ह
नाशिकमध्ये उघडकीस आलेल्या भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाने आता भीषण वळण घेतले असून गुन्हेगारी जाळ्याचे धागेदोरे दिवसेंदिवस स्पष्ट होत आहेत. या प्रकरणातील मुख्य आरोपी अशोक खरातची पत्नी कल्पना खरात हिच्याविरोधात पोलिसांनी लूकआऊट नोटीस जारी करत तिचे देशाबाहेर पळून जाण्याचे सर्व मार्ग बंद केले आहेत.
फरार पत्नीचा शोध तीव्र; पोलिसांची कडक कारवाई
अशोक खरात पोलीस कोठडीत असतानाच त्याची पत्नी कल्पना खरात अचानक फरार झाली आणि तपास यंत्रणेसमोर मोठे आव्हान उभे राहिले. मात्र आता पोलिसांनी आक्रमक भूमिका घेत लूकआऊट नोटीस जारी करत देशातील सर्व विमानतळांवर तिची माहिती पाठवली आहे. तपास यंत्रणांच्या मते ती परदेशात पळून जाण्याच्या तयारीत असल्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळेच तिच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवण्यासाठी बहुपातळी यंत्रणा सक्रिय करण्यात आली आहे.
घरच्यांचाच खेळ; नातलगांवर संशयाची सुई
या प्रकरणात सर्वात धक्कादायक बाब म्हणजे तपासाचा फोकस आता थेट कुटुंबीयांकडे वळला आहे. कल्पना खरातचे भाऊ, तसेच मुलगा हर्षवर्धन यांची SIT कडून कसून चौकशी करण्यात आली आहे. प्राथमिक चौकशीत आर्थिक व्यवहार, जमीन व्यवहार आणि संशयास्पद पैसे ट्रान्सफर यांचे धागेदोरे समोर आले आहेत. त्यामुळे हा केवळ एकट्या अशोक खरातचा प्रकार नसून संपूर्ण कुटुंबीयांचे जाळे असल्याचा संशय अधिक गडद झाला आहे.
शेतकऱ्यांची फसवणूक; सावकारकीचा सापळा
तपासात समोर आलेल्या माहितीनुसार या प्रकरणात शेतकऱ्यांना गंडा घालणे, बेकायदेशीर सावकारकी आणि कोट्यवधी रुपयांचे आर्थिक व्यवहार यांचा समावेश आहे. शिर्डी परिसरातील जमीन व्यवहारांमध्ये मोठ्या प्रमाणावर फसवणूक झाल्याचे संकेत मिळत आहेत. अनेक व्यवहार नातेवाईकांच्या नावावरून केल्याचा संशय असून काळा पैसा फिरवण्यासाठी कुटुंबीयांचा वापर करण्यात आल्याचे प्राथमिक निष्कर्ष आहेत.
कोठडीत असलेला खरात गप्प; तपासात अडथळे
अशोक खरात सध्या पोलीस कोठडीत असून त्याच्यावर महिलांवरील लैंगिक शोषण, फसवणूक आणि इतर गंभीर गुन्हे दाखल आहेत. मात्र तो तपासात सहकार्य करत नसल्याने तपास अधिक गुंतागुंतीचा होत आहे. न्यायालयाने त्याला ८ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली असून, या काळात तपास यंत्रणा अधिक पुरावे गोळा करण्याच्या प्रयत्नात आहे. आर्थिक व्यवहार, बँक खात्यांची चौकशी, परदेशी कनेक्शन आणि जमीन व्यवहारांची सखोल तपासणी सुरू आहे.











