विक्रम वरे : महान्यूज लाईव्ह
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी सोशल मीडियावर एक महत्त्वपूर्ण पोस्ट करत सध्याच्या बदलत्या रोजगार परिस्थितीवर भाष्य केले आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि तंत्रज्ञानाच्या झपाट्याने वाढणाऱ्या प्रभावामुळे नोकऱ्यांची सुरक्षितता धोक्यात आल्याची चिंता त्यांनी व्यक्त केली.
रोहित पवार यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, आजच्या AI च्या युगात कुणाच्याही नोकरीची हमी उरलेली नाही. कर्मचारी कितीही अनुभवी किंवा जुने असले तरी, कोणत्याही क्षणी अचानक नोकरीवरून कमी केल्याचा ई-मेल येऊ शकतो आणि व्यक्ती बेरोजगार होऊ शकते. या संदर्भात त्यांनी अलीकडेच Oracle कंपनीने घेतलेल्या कर्मचाऱ्यांच्या कपातीच्या निर्णयाचा उल्लेख करत, तंत्रज्ञान क्षेत्रातील अस्थिरतेकडे लक्ष वेधले.
ते पुढे म्हणाले की, हा मुद्दा अत्यंत गंभीर आणि व्यापक परिणाम करणारा असला तरी सध्याच्या राजकारणात अशा विषयांकडे दुर्लक्ष होत आहे. राजकीय वाद- विवादांमध्ये अडकून खऱ्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केले जात असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
रोहित पवार यांनी नागरिकांना आवाहन करताना सांगितले की, केवळ राजकारणात गुंतून न राहता, या बदलत्या सिस्टिमविरोधात जागरूक राहणे आणि आवश्यक तेथे एकत्रितपणे लढा देणे गरजेचे आहे. भविष्यातील रोजगार सुरक्षेसाठी समाजाने सजग राहून योग्य दिशा निवडण्याची हीच योग्य वेळ असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.











