नवी दिल्ली: महान्युज लाईव्ह
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी ४२ वी जीएसटी परिषद बैठक पार पडली. या बैठकीमध्ये काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. हे निर्णय अनेक राज्यांसाठी आनंदाची लाटचं घेऊन आली आहे असं म्हणता येईल.
बैठकीनंतर अर्थमंत्र्यांनी माध्यमांशी संवाद साधताना काही महत्त्वाच्या घोषणा केल्या. ज्याअंतर्गत केंद्रातर्फे राज्यांना २० हजार कोटी रुपयांची जीएसटीची रक्कम सोमवारी रात्रीपर्यंत देण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली.
अर्थमंत्र्यांनी केलेली ही घोषणा म्हणजे लॉकडाउनमुळे आर्थिक अडचणीत असलेल्या राज्यांसाठी एक आधारच म्हणावा लागेल.
दरम्यान, या बैठकीमध्ये केंद्रानं मांडलेल्या प्रस्तावांना जवळपास २० राज्यांनी सहमती दर्शवल्याची माहिती अर्थमंत्र्यांनी दिली.










