इंदापूर : महान्यूज लाईव्ह
इंदापूर तालुक्यात मार्चच्या अखेरच्या आठवड्यात पहिला कोरोनाचा रुग्ण आढळला, तेव्हा प्रचंड दहशत माजली होती.. त्यानंतर गेल्या सहा महिन्यात कोरोनाच्या रुग्णांचा उच्चांक होत गेला.. शंभरी पार केलेली रुग्णसंख्या इंदापूरने पाहिली.. जग सोडून जाणारे कोरोनाग्रस्तही इंदापूर तालुक्याने पाहिले.. आणि आज तब्बल सात महिन्यांनी फक्त २५ तपासण्या आणि ५ कोरोनाग्रस्त असा दिवसही पाहिला.. आरोग्य खात्याने आज हा दिवस अनुभवताना किमान आजतरी मनापासून सुटकेचा नि:श्वास टाकला.
आजचा रविवारचा दिवस इंदापूर तालुक्यासाठी फारच दिलासा देणारा ठरला. एकीकडे इंदापूर व बारामती दोन्ही तालुक्यांनी एकाच वेळी जनता कर्फ्यू पाळला. बारामतीत आधी सुरवात झाली, त्याचा परिणाम आपल्याकडेही अनुभवण्यासाठी इंदापूरातही लागलीच निर्णय घेऊन जनता कर्फ्यू पाळण्यात आला. आता पुन्हा वातावरण नेहमीसारखे झाले आहे. मात्र बारामतीत पुन्हा कोरोना वाढू लागला असला तरी इंदापूरात मात्र तिशीच्या आतबाहेर रुग्ण आहेत. आज (रविवारी) तर कळसच गाठला.
आज दिवसभरात फक्त २५ जणांची तपासणी झाली. त्यामध्ये पोंदकुलवाडी येथील ४१ वर्षीय पुरूष, नरसिंहपूर येथील ३९ वर्षीय पुरूष, इंदापूर शहरातील २८ वर्षीय पुरूष, ३४ वर्षीय पुरूष व कळंब येथील ४० वर्षीय पुरूष रुग्ण कोरोनाबाधित आढळून आले.
फक्त पाच जणच कोरोनाबाधित आढळले ही दिलासा देणारी बाब आहे. अर्थात तपासण्या कमी झाल्याने रुग्ण कमी दिसत आहेत, असे म्हणता येईलही, कारण २५ मध्ये पाच म्हणजे हे प्रमाण २० टक्के आहे, मात्र तरीदेखील हे कमी होत चाललेली रुग्णसंख्या गेली काही दिवस सातत्याने दिसत आहे. विशेष म्हणजे ही रुग्णसंख्या कमी होण्यामागे गावागावात घेतले गेलेले व सध्याही सुरू असलेले कोविड अॅंटीजेन कॅम्प कारणीभूत असल्याचा दावा आरोग्य खात्याच्या सूत्रांनी केला आहे. लोकांकडून स्वतःहून पाळले जाणारे सोशल डिस्टन्सिंग, कोरोनाबाबत झालेली व्यापक जनजागृती आणि प्रशासनाने केलेले प्रयत्न यामुळे देखील परिणाम जाणवत आहे.











