दौंड : महान्यूज लाईव्ह
महाराष्ट्रातील एकाही साखर कारखान्यांनी मागील सर्व थकीत एफआरपीची रक्कम उस उत्पादक शेतक-यांना येत्या गळीत हंगामापुर्वी व्याजासह अदा करावी, अन्यथा साखर आयुक्त कार्यालयाला टाळे ठोकू असा इशारा भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाने निवेदनाद्वारे साखर आयुक्तांना दिला आहे.
राज्यातील ज्या साखर कारखान्यांनी एफआरपी प्रमाणे ऊसाची किंमत ऊस उत्पादक शेतक-यांना दिलेली नाही त्या संबंधित साखर कारखान्यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या बॅंक खातेमध्ये येणारा गळीत हंगाम सुरू होण्यापुर्वी रक्कम जमा करण्याचे आदेश साखर आयुक्त कार्यालयाने संबंधित साखर कारखान्यांना त्वरीत द्यावेत.
तसे न झाल्यास या साखर सम्राटांना वठणीवर आणण्याचे काम भाजप किसान मोर्चाला करावे लागेल. लोकशाहीच्या मार्गाने साखर आयुक्त कार्यालयास टाळे ठोकण्याचे आंदोलन करावे लागेल. अशा इशारा निवेदनाद्वारे साखर आयुक्तांना दिला आहे.या निवेदनावर भाजप किसान मोर्चाचे राज्य सरचिटणीस वासुदेव काळे, जिल्हाध्यक्ष संजय थोरात, भाजप जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे, अॅड.धमेंद्र खांडरे, माऊली चवरे, केशव कामठे आदींच्या सह्या आहेत.











