माळेगाव – चार हजार टन मळी फक्त त्यांच्या निष्क्रीयतेने जळून जाते, चार कोटीपर्यंत नुकसान होते. सारा रस वाहून जातो, मनमानी खरेदीने माळेगावचे मोठे नुकसान झाले असा आरोप माळेगावचे माजी अध्यक्ष बाळासाहेब तावरे यांनी केला.
माळेगाव येथे राष्ट्रवादी पुरस्कृत निलकंठेश्वर पॅनेलच्या प्रचाराची सुरवात नागेश्वर मंदिर येथे झाली. यावेळी जिल्हा परीषदेचे माजी अध्यक्ष विश्वास देवकाते अध्यक्षस्थानी होते. सोमेश्वर कारखान्याचे अध्यक्ष पुरूषोत्तम जगताप यांच्या हस्ते नारळ फोडून प्रचारास सुरवात झाली. यावेळी नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, पंचायत समितीच्या सभापती निता बारवकर, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर, अॅड. एस.एन. जगताप, माळेगावचे ज्येष्ठ संचालक अॅड. केशवराव जगताप, नगरपरिषदेचे गटनेते सचिन सातव, माजी नगराध्यक्ष योगेश जगताप, सुनिल पवार यांच्यासह सर्व उमेदवार व परिसरातील विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.
बाळासाहेब तावरे म्हणाले, निष्क्रियतेचा आरोप आमच्यावर करणाऱ्यांनीच निष्क्रीय कारभार केला. सत्ताधाऱ्यांनी डोळे उघडे ठेवून आरोप करावेत, कारण 21 मेगावॉट वीजनिर्मिती प्रकल्प 71 कोटींत केला. अतिशय़ अडचणीतून केला, मात्र त्याचे फार मोठे फायदे झाले. हे सत्ताधाऱ्यांना कसे कळत नाही. जो कारखाना 4200 टनांनी चालवत होतो, तो कारखाना 6 हजार 200 टनांपर्यंत वाढवला. आताच्या सत्ताधाऱ्यांनी विस्तारीकरणाचा निर्णय घेतला, तेव्हा त्यांना सांगितले की, फक्त थोडा बदल करू, मात्र अधिक बदल करण्याची गरज नाही. पाण्याचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे, शेजारी कारखान्यांनी विस्तारीकरण केलेले आहे, अशावेळी उसाचा प्रश्न निर्माण होईल, मात्र त्यांनी लक्ष दिले नाही. आज परिस्थिती अशी आहे की, सभासदांचा ऊस राहीलेला आहे. उसाला तुरे आले आहेत. तुऱ्यांच्याही आता काड्या राहील्या आहेत. साखरेचे प्रमाण कमी होत चालले आहे, अजूनही सभासदांचा ऊस गाळप होत नाही. फेब्रुवारी महिना निम्मा होत आला आहे, मार्च लागला की उष्णता वाढत जाणार आहे. गेटकेनवाल्यांचे वजन वाढले आणि सभासदांचे वजन घटले. वास्तविक पाहता चार वर्षे आपण लक्ष ठेवतो आणि केवळ निवडणूकीपुरते जर ते दिशाभूल करणार असतील तर सभासदांनी विसरू नये. चार वर्षात सभासदांनी झालेले नुकसान विसरू नये.
पुरूषोत्तम जगताप म्हणाले,बारामती हे सहकाराचे मॉडेल आहे. सोमेश्वरची प्रगती करण्यासाठी राजकारण पणाला लावणारे नेतृत्व आपले आहे, त्यामुळे माळेगाव कारखान्यात परिवर्तन करा. आम्ही सोमेश्वरमध्ये ऊसदर दिलाच, शिवाय भविष्यातील कोणत्याही समस्येवर मात करण्यासाठी 20 कोटींचा चढउतार निधी ठेवला. अशा स्थितीत 3400 रुपये दर जाहीर करताना हा दर कसा बसतो याचा गांभिर्याने विचार करायला हवा होता, केवळ निवडणूकीला समोर ठेवून दर देऊन सभासदांची दिशाभूल करण्यात आली आहे, त्यामुळे सभासदांनी विचार करावा. कर्ज काढून हा दर दिला जात असेल तर मालक म्हणून सभासदांनी याचा विचार करावा. अनेक कारखाने दर चांगला दिसतो म्हणून चांगले चालतात असे वाटत असेल, तर तसे नाही, गंभीर स्थिती आहे.
यावेळी इतरही पदाधिकाऱ्यांची भाषणे झाली.










