महान्यूज लाईव्ह रिपोर्ट
बारामती व इंदापूर तालुक्यात आजवर दोनशेहून अधिक जण कोरोनाविरोधातील लढाईत बळी पडले.. काहींची कुटुंबे अंत्यविधीला देखील उपस्थित राहू शकली नाहीत…कुठे घरातील सख्खे भाऊ, कुठे पतीपत्नी, तर कुठे बापलेकही जग सोडून गेले.. त्यांची हळहळ आजही व्यक्त केली जाते.. मात्र जळगाव जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यात साकरे गावात एकाच कुटुंबातील चारही कर्ती माणसे कोरोनाच्या लढाईत धारातिर्थी पडली.. हसते खेळते एकत्र कुटुंबच उध्वस्त झाल्याने कोरोनाच्या उपचारात अगोदरच लाखो रुपये गेल्यानंतर आता घर कसे चालवायचे हे त्या घरातील मागे उरलेल्या महिलांना प्रश्न पडला आहे..
धरणगाव तालुक्यातील साखरे गावातील वाणी कुटुंबावर आलेला हा आघात इतर कोणाच्याही वाट्याला न येवो अशीच प्रार्थना केली जात आहे. साखरे येथे अमृतकर (वाणी) यांचे एकत्रित कुटुंब आहे. या कुटुंबातील चार कर्तीधर्ती माणसं कोरोनाने हिरावून नेली आहेत, याचा धक्का संपूर्ण जळगाव जिल्ह्याला बसला आहे.
व्यवसायिक कुटुंब असलेल्या या कुटुंबातील पुंडलीक अमृतकर, शांताराम अमृतकर हे दोघे भाऊ आणि पुंडलिक यांची दोन मुले सतीश व सुनील यांचे या कोरोनाच्या महामारीत उपचारादरम्यान निधन झाले. सप्टेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून सुरू झालेले हे दुर्देवाचे दशावतार २ ऑक्टोबरला पुंडलीक यांचा बळी घेऊन संपले आहेत. कोरोना मात्र अजूनही संपलेला नाही आणि त्याचा धाकही संपलेला नाही. कर्तीधर्ती मुले जग सोडून गेल्याने खरेतर पुंडलीक यांना धक्का बसल्याचे बोलले जाते. ते खचल्याने त्यांची कोरोना विरोधातील लढाई कमकुवत बनली आणि त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली.
व्यवसायाच्या निमित्ताने कर्ज घेतलेली आहेत. १३ पैकी ४ जण निघून गेले आहेत, आता लहान मुले व महिलांवर कुटुंबाचा भार आहे. एकाच कुटुंबातील सारी कर्तीधर्ती माणसे कोरोनाने हिसकावून नेली. आता घराचा गाडा कसा ओढायचा हा प्रश्न या कुटुंबातील उरलेल्या ९ जणांपुढे आहे.











