महान्यूज लाईव्ह रिपोर्ट
जनावरांमधील कांगो ताप रोगाचा माणसांनाही धोका आहे. हा धोका गुजरातमध्ये जाणवू लागला असून याचीही औषधे नाहीत, त्यामुळे कोरोनानंतर हा एक नवा ताप डोकेदुखी ठरणार असून गुजरातमधून पालघरमध्ये हा ताप येऊ शकतो, म्हणून पशुसंवर्धन विभागाकडून कसून तपासणी सुरू आहे.
पशुसंवर्धन विभागाने गुजरातची सीमा महाराष्ट्राला जिथे जवळ आहे, तिथे काळजी घेण्याचे आवाहन केले असून जनावरांमधील गोचिड निर्मूलनाचेही आदेश दिले आहेत. गुजरातमधील कच्छ जिल्ह्यात याचा प्रसार वाढला असून हा नॅरो विषाणूमुळे होत असलेला जीवघेणा आजार आहे. उपचार व निदानाअभावी संसर्ग झालेल्या व्यक्तींचे मृत्यूचे प्रमाण यामध्ये ३० टक्क्यांपर्यंत आहे.
महत्वाची गोष्ट म्हणजे हा आजार जनावरांमार्फत पसरतो. मात्र त्यातही पाळीव जनावरांमधील गाई, म्हशी, शेळ्या मेंढ्यांमध्ये याची लक्षणे दिसत नाहीत. मात्र ते सायलंट कॅरीअर असतात. हा विषाणू हायलोम्मा जातीच्या गोचिडापासून पुढे पसरत असल्याने राज्यात गोचिड निर्मूलनाची सुरवात करण्यात आली आहे. हा ताप सुरवातीस कांगो या दक्षिण आफ्रिकेच्या देशात आढळला होता. त्यामुळे त्यास कांगो असे नाव पडले आहे.
याची ही आहेत लक्षणे
डोकेदुखी, सांधेदुखी, पोटदुखी, उलटी अशी याची सुरवातीची लक्षणे असून घशात तसेच तोंडातील वरच्या भागात लाल ठिपके दिसतात. काही रुग्णांमध्ये काविळीसारखी लक्षणे दिसतात.











