नानाची टांग
निकाल लागला एकदाचा, किटाळ गेलं सरून..
बाबर आणि रामाचं बहुधा वैर गेलं मरून…
७ व्या वर्षी झालेल्या बलात्काराचा ७० व्या वर्षी निकाल लागतो..
त्या न्यायव्यवस्थेला आता सलाम ठोकावा वाटतो..
तरूणपणात केलेल्या आंदोलनाचा म्हातारपणात निकाल लागला..
लाल, बाल आणि जेवढे असतील, तेवढ्यांना दिलासा मिळाला..
जे घडतंय ते बरं घडतंय असंच म्हणायचं..
किती दिवस नाहीतरी तेच धरून बसायचं..
दुकानात नाही सामान आणि रस्ते पडले ओस..
कोरोनाच्या रोगानं, सरला जगायचा जोष..
अयोध्येचा एक महत्वाचा विषय गेला सरून..
हाथरसच्या निरागस मुलीचं प्रकरण गेलं जिरून…
मिडीयाला देखील बरं वाटलं, अडचण गेली विरून..
नाहीतर जर खरं दाखवायचं, तर साहेब गेला असता ना चिडून..
चार महिने एका गांजाड्यासाठी सारे कामाला लावले..
श्रमिकांच्या मृत्यूला नो डाटा म्हणत सरकार जगावेगळे झाले..
राजकारण, राजकारण असते तेच, जे तुम्ही साऱ्यांनी पाहिले..
गुजरात दंगलीतील पोस्टर बॉय मग तो,
अशोक परमार, कुतबुद्दीन अन्सारी असेल..
आज जरा गाढ झोपतील..
आपलेच चेहरे होते पुढे, आता न दिसतील..
देशाचा गाडा जीडीपीच्या चाकाखाली दबला..
गावागावातील रस्ता वाळूवाल्यांनी मोडला..
वहिवाट मोडलीच आहे, सुसंस्कृतपणाची…
शाळा देखील राहीली नाही, सभ्य भिंतींची..
पैशापुढं सारं फिकं, मी देखील मोडून पडलो..
काळजी घ्या रं बाबांनो, उगीच कधीकाळी भिडलो..
दिड वितीच्या पोटासाठी आता मारामार आहे..
कोरोनाच्या नावाखाली सगळा बाजार भरला आहे..
उद्या देखील काय घडेल याचा भरवसा आहे काय?
जगणं जगायला सरकार खरंच उपयोगी पडेल काय?











