दौंड : महान्यूज लाईव्ह
सरकारी यंत्रणा निर्लज्ज असते फक्त पैशाचा जिथे स्त्रोत असतो तिथे मात्र वाटेल त्या पद्धतीने कायदे वळवण्याचे काम अधिकारी करतात मात्र सामान्य जनतेच्या समस्यांचे त्यांना काहीच देणे घेणे नसते.. या प्रशासनाची लाज मात्र दौंडच्या तरुणांनी वेगळ्या पद्धतीने काढली. जेव्हा रस्त्यावरील खड्डे बुजवत नसल्याने प्रशासनाचा निषेध म्हणून एक बुजगावणे उभे करून पुढे खड्डा आहे हे सामान्य जनतेला सांगण्याचा अभिरूप प्रयोग व निषेध दौंडच्या तरुणांनी केला..
दौंड शहरातील नागरीकांना शहरातील रस्त्यावरील खड्डे हे पाचवीलाच पुजले आहे. दौंड शहरातील चौका चौकातील रस्ते, दौंड -नगर, दौंड – पाटस, दौंड- सिध्दटेक, दौंड कुरकुंभ या मुख्य रस्त्यावर बारामही खड्डे झाल्याने दुरावस्था झाल्याचे चित्र पहावयास मिळते.
पावसाळ्यात तर या रस्त्याची काय भयानक अवस्था असते आणि याचा किती त्रास शहरवासीयांना होतो हे सांगणे कठीण आहे.
तालुक्यातील ग्रामीण भागातून येणाऱ्या नागरीकांनाही या त्रासाला सामोरे जावे लागते, शहरातील रस्त्यावर धोकादायक व जीवघेण्या खड्डे यामुळे शहरातील नागरीक पुरते वैतागले आहेत. सध्या शहरातील रस्त्याच्या दुरुस्तीचे काम चालू आहे, मात्र संबंधित ठेकेदाराकडून वेळेत कामं पुर्ण होत नाहीत. परिणामी अर्धवट कामामुळे रस्त्यावरील खड्डे व रस्त्याच्या कामासाठी आणलेले साहित्य रस्त्यावर व रस्त्यालगत इतरत्र धोकादायक अवस्थेत पडलेले असते. यामुळे या सातत्याने छोटे मोठे अपघातात होत असतात.
शहरातील मुख्य रस्तावर मोठा खड्डे पडल्याने व संबंधित ठेकेदार खड्डे बुजविण्यासाठी चालढकल करीत दुर्लक्ष करीत आहे. शहरातील कुरकुंभ मोरी बाहेर ऑप्टिकल फायबर जमिनीखाली अंथरण्यासाठी खोदलेला खड्डा न बुजवल्याने या ठिकाणी सातत्याने अपघात होत आहेत, तसेच ज्येष्ठ व महिलांना ही येजा करताना नाहक त्रास होत आहे, दुचाकीवरील अनेक जण या खड्यामुळे पडली आहेत,हा रस्ता शहरातला मुख्य रस्ता असल्याने व याच रस्त्याने दौंड शहराच्या मुख्य भागात जावे लागत असल्याने हा खड्डा चुकवताना अनेक वाहन चालकांमध्ये गोंधळ उडतो, गडबडत होते. याच ठिकाणी आता ठेकेदाराचा निषेष म्हणून शहरातील झुंज मित्र मंडळाच्या कार्यकर्त्यांनी या खड्याला राखण म्हणून चक्क बुजगावणे उभे केले आहे. हो हेच बुजगावणे, जे शेतकरी पिकांचे पक्षापासून रक्षण करण्यासाठी पिकांना राखण म्हणून उभे करते.. खड्डे बुजविण्यात टाळटाळ करणारा ठेकेदाराचा निषेध या कार्यत्यांनी अनोख्या पध्दतीने केले आहे. शहरातील नागरीकांनी झुंज मित्र मंडळाच्या या अनोखा निषेधाचे समर्थन केले आहे, ठेकेदाराने आता तरी हा खड्डा बुजवावा अशी अपेक्षा नागरिक करीत आहे.










