महान्यूज : आजची गझल
वेगळे व्हायचे कसे आपण ?
याच भीतीमुळे ‘असे’ आपण
थांग शोभे तिला समुद्राचा
आणि वाळूतले ठसे आपण
कुट्ट काळ्या जगामधे सुद्धा
लख्ख बावनकशी कसे आपण ?
धावताहेत सर्व वेगाने
चालतोही कसे-बसे आपण
दोन टोकांस बेड च्या आपण
दूर नाहीच फारसे आपण
वेळ आली, चला, विकूया का ?
या समाजात आरसे आपण
होय, गांधीच सर्व… बाहेरुन
आतल्या आत ‘गोडसे’ आपण
गझलकार – भालचंद्र भुतकर
सौजन्य : गझलपुष्प समूह पिंपरी चिंचवड











