सुरेश मिसाळ : महान्यूज लाईव्ह
शेतकरी जन्मजातच संशोधक असतो असं म्हणतात, त्याला उगीच हाडाचा शेतकरी असंच कोणी म्हणत नाही.. कारण समस्यांचा डोंगर हा शेतकऱ्यांच्या पाचवीलाच पुजलेला आहे आणि त्यातून वाट काढण्याची त्याची पद्धत ही जणू त्याच्या रक्तातच भिनलेली असते, म्हणूनच प्रत्येक समस्येला उत्तर शोधत त्या समस्येला भिडत शेतकरी आपला मार्ग शोधत असतो.. इंदापूर तालुक्यातील जाचकवस्ती येथील भिमराव जामदार त्यापैकीच एक..! आज सगळीकडे दुधाच्या समस्यांनी शेतकऱ्यांचा टाहो ऐकू येत असताना दुधाळ जनावरांबाबत त्यांनी स्वतःच केलेले प्रयोग राज्यातील दुध उत्पादकांसाठी अनुकरणीय असेच आहेत.
याचा व्हिडीओ येथे पहा किंवा महान्यूज लाईव्ह या फेसबुक पेज व महान्यूज लाईव्ह यु ट्यूब चॅनेलवर पाहू शकता.
जामदार यांचा गुरांचा गोठा म्हणजे जणू संशोधनाचं एक चालतं बोलतं विद्यापीठ आहे. दुधाची प्रतवारी व गायींच्या दर्जा व गुणवत्तेसंदर्भात त्यांनी केलेले संशोधन हे भल्याभल्यांना विचार करायला लावणारे असेच आहे. भीमराव निवृत्ती जामदार यांनी असं काय केलंय हा प्रश्न अनेकांना पडू शकतो. जामदार यांनी मागील २५-३० वर्षात दुधाचा धंदा करताना अनेक चढउतार पाहिले, त्यातून त्यांनी दुधाची प्रतही चांगली राहीली पाहीजे व गायी देखील अधिक दुधाळ असल्या पाहिजेत यासाठी सातत्याने टक्केवारी व देशी गायीच्या अनुवंशिकतेचा मेळ जुळवला. त्यांनी सिंधी गायीपासून उच्च प्रतीच्या कृत्रिम रेतनाद्वारे सहिवाल व गीर गायीच्या नव्या कालवडींची पैदास केली. त्याद्वारे अधिकाधिक दुध उत्पादन वाढविण्याचा प्रयत्न केला. हे दुध वाढवतानाच त्यांची प्रतवारी उत्तम राहील याची दक्षता घेतली. आज त्यांच्याकडे तीन तीन पिढ्या असलेल्या गायी आहेत. त्यांच्याकडून उत्तम प्रतीची गीर व सहिवाल जातीच्या कालवडी जन्माला घालून आता त्यांच्या दुग्धोत्पादनाची तयारी चालवली आहे.
जामदार यांचा पिंड शेतकऱ्याचा व धर्म वारकऱ्याचा आहे. साहजिकच अंधश्रध्देला मूठमाती देणारा व प्रत्येक गोष्टीकडे डोळसपणे पाहून पुरोगामी पणाचा स्वभाव आहे. कोणतीही गोष्ट पाहिली की, त्याच्या खोलवर शिरून त्याची माहिती घेण्याच्या या स्वभावातूनच त्यांच्या गोठ्याचा जन्म झाला.
अर्थात तो काळ आताचाच नाही. सन १९८८-८९ मध्ये त्यांनी गोपालनाला सुरवात केली. या दरम्यान त्यांनी प्रवचनही देण्यास सुरवात केली. या प्रवचनादरम्यानच देशी गायीच्या महत्वावर सांगायची वेळ यायची. तेव्हा त्यांच्या लक्षात आले की, फक्त देशी गाय पाळा असे सांगणे सोपे आहे, मात्र त्यातून शेतकऱ्यांची आर्थिक प्रगती साधणे शक्य नाही. त्यामुळे विज्ञानाची कास धरावीच लागेल आणि दुधाच्या प्रतवारीला तडजोड न करता अधिक उत्पादनाच्या देशी गायीच्या मिळत्याजुळत्या संकराला जन्म देण्याची गरज त्यांनी जाणली आणि स्वतःपासून प्रयोगाला सुरवात केली.
जामदार यांच्या गोठ्यातील एकही गाय प्रतिवेत ४ हजार ५०० लिटरपेक्षा कमी दूध देत नाही आणि एका दिवसाला २० लिटरपेक्षा एकही गाय कमी दूध देत नाही. या गायींच्या दुधाची प्रतवारी अगदी देशी गायींच्या बरोबरीचीच असते. त्यामुळे गाय दिसायला संकरीत दिसत असली तरी दुधाचा दर्जा मात्र देशी ठेवण्यासाठी त्यांनी केलेले कष्ट महत्वाचे आहेत.
जामदार यांच्याकडे त्यांच्या गोठ्यातील प्रत्येक गायीची कुंडली आहे. त्यामुळे त्यांची टक्केवारी कमी करीत, कमी करीत त्यांनी देशी गायीच्या उत्तम वळूंचे रेतन करवून या टक्केवारीला देशी साज दिला आणि आज त्यांच्याकडे उत्तम प्रतीच्या सहिवाल, गीर गायींचे वंश वाढत आहेत. अर्थात त्यांचा हा प्रयोग एका दिवसाचा, एका वर्षाचा नाही, त्यामागे २५-३० वर्षांची अखंड साधना आहे. म्हणूनच दुधाबाबत तळमळीने बोलताना जामदार कोणाचीच भीड ठेवत नाहीत. त्यामुळेच दुधाच्या बाबतीत त्यांचाही ओढा हा अधिक दुध उत्पादन, अधिक दर्जेदार उत्पादनावर आहे आणि त्यातूनच शेतकऱ्यांची दशा आणि दिशा बदलू शकते यावर त्यांचा विश्वास आहे.
जामदार म्हणतात, अजून दोन वर्षांनी हा गोठा उत्तम प्रतीच्या गायींनी भरलेला असेल. जे आजवर मी करीत आलो, त्याचा हा कळसाध्याय असेल. ज्या दुधावरून शहरातले एसी घरात बसून उपदेश पाजणारे महाभाग ए-१, ए-२ याबाबत बोलतात, त्यांनी आता फक्त देशी-देशीचा मंत्र सोडून द्यावा. शेतकरी अंधश्रध्दाळू नाही, त्याला स्वतःची दशा बदलायची आहे. त्याला फक्त जनावरे जगवायची नाहीत, तसे करीत गेल्यास शेतकरी उध्वस्त होतील, मात्र देशी गोवंश हा आपला कणा आहे, तो अर्थव्यवस्थेचा कणा होण्यासाठी त्यामध्ये सुधार ही काळाची गरज आहे, बारामतीत हे संशोधन होतच आहे, तोपर्यंत शेतकऱ्यांनीही तो आत्मसात करण्याची गरज आहे.










