भवानीनगर : महान्यूज लाईव्ह
बऱ्याच न्यायालयीन लढाईनंतर छत्रपती सहकारी साखर कारखान्याची संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक अखेर जाहीर झाली. राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाचे सचिव अशोक गाडे आणि प्रादेशिक सहसंचालक तथा जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी नीलिमा गायकवाड यांनी आज याची घोषणा केली.
छत्रपती सहकारी साखर कारखान्याची 7 एप्रिल 2025 रोजी निवडणूक जाहीर होईल. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची व स्वीकार करण्याची मुदत 7 एप्रिल 2025 ते 15 एप्रिल 2025 पर्यंत राहणार असून, पात्र उमेदवार यादी 16 एप्रिल 2024 रोजी जाहीर होणार आहे. वैध झालेल्या नामनिर्देशन पत्रांची यादी 17 एप्रिल रोजी सकाळी 11.30 वाजता जाहीर केली जाणार आहे.
त्यानंतर उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत 17 एप्रिल 2025 ते 2 मे 2025 पर्यंत राहणार आहे.
निवडणूक रिंगणात माघार घेतलेले उमेदवार वगळता निवडणूक रिंगणात उतरणारे उमेदवार त्यांची यादी व त्यांना निशाणी वाटपाची मुदत 5 मे 2025 रोजी होणार असून 18 मे 2025 रोजी सकाळी आठ ते संध्याकाळी पाच या वेळेत मतदान घेतले जाणार आहे.
19 मे 2025 रोजी सकाळी 9 वाजता मतमोजणी सुरू होणार असून याच दिवशी मतमोजणीचा निकाल जाहीर केला जाणार आहे. एकूण 21 संचालकांसाठी ही निवडणूक होणार असून उमेदवारी अर्जाचे शुल्क 100 रुपये राहणार आहे. सर्वसाधारण आणि इतर मतदारसंघासाठी 1 हजार रुपये निवडणूक अनामत ठेव आहे.
अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील उमेदवारांकरिता 300 रुपये निवडणूक अनामत ठेव असणार आहे. छत्रपती कारखान्याच्या संचालकांची मुदत 2020 मध्ये संपली होती. मात्र त्यानंतर आत्तापर्यंत वेळोवेळी न्यायालयीन कारणाबरोबरच कोरोना आणि प्रशासकीय कारणावरून संचालक मंडळाला मुदतवाढ मिळाली.











