लोणी काळभोर : महान्यूज लाईव्ह
काही दिवसांपूर्वी शेवाळेवाडी परिसरात सतीश वाघ यांचा खून झाला होता. त्यांचा खून त्यांच्या पत्नी आणि तिच्या प्रियकरानेच केल्याचे समोर आले होते. या घटनेने संपूर्ण पुणे हादरले. त्यानंतर आता पुन्हा एकदा लोणी काळभोर परिसर एका खुनाने हादरला आहे. अर्थातच उद्योजक सतीश वाघ यांच्याप्रमाणेच हा देखील खून बायकोच्या प्रेमप्रकरणातूनच झाला आहे.
रवींद्र काशिनाथ काळभोर यांची वडाळे वस्ती येथे राहत्या घराबाहेर अंगणात झोपल्याच्या स्थितीत डोक्यात दगड आणि लाकडी दांडक्याने वार करून खून करण्यात आला. या खुनाचा तपास लोणी काळभोर पोलिसांनी अवघ्या तीन तासात लावला. पोलिसांनी या प्रकरणात रवींद्रची पत्नी शोभा रवींद्र काळभोर आणि तिचा प्रियकर गोरख त्र्यंबक काळभोर या दोघांना अटक केली.
सोमवारी रवींद्र काळभोर हे घराबाहेर पलंगावर झोपले होते. यावेळी गोरख काळभोर याने खोऱ्याच्या दांडक्याने डोक्यावर जोरात वार करून रवींद्र यांना जागीच ठार केले. सकाळच्या वेळी रवींद्र काळभोर हे रक्ताच्या थारोळ्यात आढळल्याने, तातडीने दवाखान्यात नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्यांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट केले.
त्यानंतर पोलीस पोचले आणि आजूबाजूच्या परिसरात त्यांनी माहिती घेतली असता, रवींद्र याची पत्नी शोभा आणि गोरख यांच्यातील अनैतिक संबंधाची माहिती त्यांना मिळाली. त्यांनी दोघांना ताब्यात घेतले आणि पोलीसी स्टाईलने चौकशी केली असताच दोघांनीही गुन्ह कबूल केला. शोभा आणि गोरख या दोघांच्या अनैतिक संबंधात रवींद्र हे अडथळा बनत होते. त्यांना दूर करण्यासाठीच त्यांचा खून करण्याचा कट दोघांनी रचला.
लोणी काळभोरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे आणि पोलीस उपायुक्त राजकुमार शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार अनिल जाधव, उदय काळभोर, सर्जेराव बोबडे, पूजा माळी, दिगंबर सोनटक्के, देवीकर, शिंदे, जोहरे, नवले, होले यांच्या पथकाने ही कामगिरी केली.











