Beed crime
बीडच्या कारागृहात सोमवारी सकाळी दोन गटांमध्ये हाणामारी झाली. यामध्ये वाल्मीक कराड आणि सुदर्शन घुले जखमी झाल्याचे सांगितले जात आहे. आता येथून त्यांना हलवण्यासाठी हा प्रकार आहे की, खरोखरच यामध्ये गुन्हेगारी प्रकरण आहे हे मात्र अद्याप समोर आलेले नाही.
सोमवारी सकाळी बीडच्या जिल्हा कारागृहात महादेव गीते आणि अक्षय आठवले या दोघांनी वाल्मीक कराड आणि सुदर्शन घुले या दोघांना मारहाण केल्याची माहिती मिळत आहे. मात्र जिल्हा कारागृहाने याबाबत अद्याप दूजोरा दिलेला नाही. बापू आंधळे खून प्रकरणात आपल्याला जाणीवपूर्वक अडकवले या रागातून सुदर्शन घुलेला लाथाबुक्याने मारहाण करण्यात आली, तर वाल्मीक कराडला ही कानाखाली मारहाण करण्यात आल्याची माहिती दिली जात आहे.
दरम्यान गेल्या काही दिवसांपासून वाल्मीक कराड आणि त्याच्या टोळीला पोलिसांकडून शाही वागणूक मिळत असल्याच्या अनेक बातम्या प्रसारित होत आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्हा कारागृहात झालेला हा कथित हाणामारीचा प्रकार त्याचाच एक भाग आहे का? ही देखील शंका उपस्थित केली जात असून पोलिसांनी संबंधित ठिकाणी हस्तक्षेप केल्याचे सगितले जात आहे.











