मुंबई : महान्यूज लाईव्ह
राज्याचे शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी विधानसभेत राज्यातील खाजगी शिकवणी वर्गांवर नियंत्रण ठेवण्यासाठी व विद्यार्थ्यांना दर्जेदार व किफायतशीर शुल्कात शिक्षण मिळण्यासाठी नवीन कायदा आणणार असल्याची माहिती दिली आहे. त्यामुळे गेल्या काही वर्षांपासून राज्यात फोफावलेल्या व मस्तवाल झालेल्या खाजगी अकॅडमींना वेसन बसेल का? याची आता उत्सुकता आहे.
अमोल मिटकरी यांनी आज विधानपरिषदेत या संदर्भातील माहिती विचारली होती. तेव्हा शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी वरील माहिती दिली. केंद्र सरकारने देखील खाजगी शिकवणी वर्गांवर नियंत्रण ठेवण्याच्या दृष्टीने मार्गदर्शक सूचना जाहीर केलेल्या आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात देखील खाजगी शिकवणी वर्गावर नियंत्रण आणण्यासाठी नियमावली तयार करण्याचा प्रस्ताव आयुक्त पातळीवर तयार करण्यात आला आहे.
विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन नवीन अधिनियम तयार करण्याची प्रक्रिया सुरू आहे. अकॅडमी अतिशय भरमसाठ शुल्क घेतात आणि पालकांवर आर्थिक ताण येतो. त्यामुळे या विषयावर नियम आणायचे व नियमानुसार या अकॅडमींना वेसन घालण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे देखील भुसे यांनी स्पष्ट केले.











