ज्ञानेश्वर रायते, बारामती
मोऱ्या उठ.. बघ तू म्हणत होतास ना; आताच्या काळात फक्त न्यायव्यवस्थेचा आधार आहे म्हणून.. बघ लोकशाहीर अण्णाभाऊ फार आतलं, तळमळीचं बोलून गेले, न्यायव्यवस्था रखेल झाली.. इथली न्यायव्यवस्था भ्रष्टतेने रंगीन झाली.. किती वर्षापूर्वी? त्यावेळी खरंच रखेल नसलेल्या, पण तिकडे प्रवास सुरू केलेल्या या व्यवस्थेविषयी ते बोलले होते.. आज ते किती किती खरं झालंय ना?
मोऱ्या, तुला पहिला धक्का बसला होता ना महाराष्ट्रात? दिवसाढवळ्या पक्ष चोरीला गेले.. आणि महाराष्ट्रातील सज्जनच अचूक (अ)न्यायव्यवस्थेच्या गप्पा मारू लागले.. साऱ्यांना माहित होतं..पण आंधळ्या न्यायव्यवस्थेलाच माहित झाले नाही.. तिच्या वजनकाट्याखाली तांत्रिक, दोषांचे किती ग्रॅम वजन कमी झाले? तिलाच माहिती नव्हते, न्याय देण्यासाठी नाही, लांबवण्यासाठीच आपला उपयोग होतो..! मोऱ्या.. अरे रामशास्त्री प्रभुणेच्या मातीतच असे काळे हिरे जन्माला आलेत, की आता सांगायलाही लाज वाटावी..! त्यापेक्षाही लाज अशी की खुर्चीवरून खाली उतरल्यावर त्यांनी मोठी ऐट मारावी! ज्याला सिंघम न्यायाधीश म्हणावं तो तर भुक्कड निघाला..! आमचा बाप.. अण्णाभाऊ त्यावेळी खरंच सौ टका खरं बोलून गेला!
मोऱ्या, शिंच्या.. लोकशाहीचं काय व्हायचं ते सोड, तुला मागच्या महिन्यात देखील असाच एक धक्का बसला होता ना रे? की एक न्यायदेवता उघड्या डोळ्याने म्हणाली, साक्षात एका मंत्र्याला कशी शिक्षा सुनवावी म्हणून? एवढा खर्च बिचाऱ्याने केला, तो वाया जाईल म्हणून न्यायदेवता देखील रडू लागली ना? शिवाय भ्रष्ट अधिकाऱ्यांबरोबर एक न्यायदेवता रंगपंचमी पण खेळली ना? पण मोऱ्या अशा रंगीन व्यवस्थेचे सत्य जाणून नको अस्वस्थ होऊस! नको धक्के घेऊ बसवून.. अलीकडे हार्ट अटॅकचे प्रमाण जास्त वाढलंय बाळा! आता तू तू स्थिरावं जरा.. वय झालंय, स्वतःला समजावं..तु तू काही साधासुधा माणूस नाही, तू सुद्धा धक्कापुरुष होणार आहेस म्हटलं..!
मोऱ्या, तुझ्याही मनाला कुठल्याच गोष्टींचं आता आश्चर्य वाटणार नाही बघ..! अरे बघ बघ.. ती काळरात्र.. दिल्लीच्या कोण्या एका न्यायाधीशाच्या कोठीवर रात्रभर जळत होत्या चलनातल्या नोटा! खोटं वाटतं का तुला? घरात जळालेल्या नोटा सापडल्या.. त्याही कोट्यावधींच्या मोजता न येणाऱ्या.. जळाल्या किती? अरे त्याची मोजदादच नाही.. पूर्वीचे न्यायाधीश कसे होते रे? असं काही घडलं की राजीनामा द्यायचे! चुकीचं काय असेल, तर बिनबोभाट बाजूला व्हायचे! आता तसं घडतंय का? अरे घराला आग लागली म्हणून तरी कळले.. पण न्यायाधीश तर म्हणाला, मी नाही त्यातला! पूर्वी लोक म्हणायचे कायदा पाळणाराच कायद्याला घाबरतो.. आता इथे तर कायदा मोडणारा संरक्षण मिळवतो!
अशी रखेल झाली बघ आता व्यवस्था! धनलांडग्याची आणि गर्भश्रीमंतांची! या व्यवस्थेचे सारे खांब कोसळून पडलेत.. नाहीतर एकमेकात तरी घुसमटलेत! त्यांचं आता बरं चाललंय.. एकमेकांवर जगणं चाललंय! खरं काही बोलायचं नाही.. खरं काय दाखवायचं नाही.. खरं काही वागायचं नाही.. खरं काही वागवायचं नाही.. अशी या चार खांबांची स्थिती झालीय!
आता फक्त उघड्या डोळ्यांनी बघायचंय. डोळ्यावरची पट्टी काढलेली न्यायदेवता, यात नेमका कसला न्याय देते? हेही बघायचंय मोऱ्या, की घरात सापडलेली बंडले, भलेही आगीत जळाली असतील.. पण इस बंदे मे कुछ तो दम है असं म्हणून कोणीतरी उलटं ह्यो तर आपल्याच फायद्याचा म्हणून; याच न्यायदेवतेला पुढची मुख्य न्यायदेवता बनवेल काय? अंग थरथर कापतंय.. ओठही थरथर कापू लागलेत.. काहीही घडू शकतं..पण थांब,तुझ्याही मनात शिव्या आल्यात ना? नाही.. नको बाबा.. ओठावर आणू नकोस! उद्या कदाचित तुझ्यावर देशद्रोहाचा मोठा गुन्हा दाखल होईल..!
कोणी सांगावं, त्याचा न्याय उद्या याच वशिल्याच्या न्यायदेवतेच्या हातात असेल! तुझा वध होईल मोऱ्या! अन लोकांनी असंतोष करू नये म्हणून तुझ्या फोटोवर दुधाभिषेक देखील होईल बरं का! पुन्हा तू आपल्या धर्माचा म्हणून भविष्यकाळात धर्माचं राजकारण देखील होईल तुझ्या नाववर! कसं म्हणतोस का? अरे अनेक लढाया जिंकलेले शिवछत्रपती गुडघीच्या आजाराने गेले म्हणतात; ना त्यांच्या आधी ना त्यांच्या नंतर कोणालाच गुडघे रोग झाला! अन तुकोबारायांचेही तसेच.. ना त्यांच्या आधी ना त्यांच्या नंतर कोणीही विमानाने स्वर्गात गेलं! तसं तुझंही होईल; तुझ्या वधाचं बालंट येऊ नये म्हणून, समाजसेवक म्हणून तुला मिरवतील; जयंती, उत्सव करतील आणि नंतर धर्मामध्ये उपयोग करतील! बरं ते जाऊ दे!
आता साव कोण आणि चोर कोण? ओळखायला कसलीच मोजपट्टी नाही.. तुझ्या माझ्या हाकेला न्याय आता मिळणार नाही.. तू न्याय मागूच नकोस.. तसाही तो मिळणार नाही.. जर असतीलच तुझ्या खिशात काही दामदिवटे.. तरच काहीतरी अर्थ; नाही तर लढण्याला ‘अर्थ’ च उरणार नाही..! मोऱ्या, मोऱ्या.. तुला सांगतो, रखेल झालेल्या या व्यवस्थेपुढे मी आणि तू देखील शरणागत आहे.. पण झुंडशाही आहे, म्हणून बोलायचेच नाही का? जे तुझ्या मनात, जे माझ्या मनात, मी ते बोलणार आहे..! ठाऊक आहेत मला, त्याचे परिणाम! पण कोणीतरी वात लावायलाच हवी ना? नाहीतर तसाही काय जगून फायदा होणार आहे?











