विक्रम वरे : महान्यूज लाईव्ह
राज्यात गेल्या काही दिवसापासून शक्तीपीठ महामार्गाची चर्चा सुरू आहे त्यातही या महामार्गावरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आंदोलन सुरू केले आहे याच पार्श्वभूमीवर आज बारामतीत आलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांनी शक्तिपीठ महामार्गात 50 हजार कोटींच्या घोटाळ्याचा आरोप केला आहे.
शेट्टी यांनी आज बारामती पत्रकार परिषद घेतली त्यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले, हा महामार्ग भाविकांसाठी नाही तर हा महामार्ग राजकीय नेते व प्रशासनातील अधिकाऱ्यांच्या केवळ फायद्याचा आहे. याचा विकासाशी संबंध नाही. तब्बल 50 हजार कोटींचा घोटाळा या महामार्गाच्या कामात होणार आहे. अव्वाच्या सव्वा दराने हा महामार्ग बांधला जाणार आहे.
आज देशात जे रस्ते बांधले जात आहेत, त्याच्या एका किलोमीटरच्या सहा पदरीकरणासाठी साधारणपणे 35 कोटी रुपये खर्च येतोय, मात्र शक्तिपीठ महामार्गाचा खर्च हा एका किलोमीटरला तब्बल 107 कोटी 60 लाख रुपये म्हणजेच तिपटीच्या आसपास आहे. या महामार्गाची लांबी 802 किलोमीटर लांबीची असून, त्यासाठी तब्बल 86 हजार 300 कोटी रुपये खर्च होणार आहे. खरे तर हा महामार्ग फक्त तीस ते पस्तीस हजार कोटीत व्हायला पाहिजे. मात्र 50 हजार कोटी रुपयांचा यामध्ये घोटाळा होणार आहे.
म्हणून शेतकरी आत्महत्या करतोय; त्यांचा आणखी एक आरोप!
दरम्यान राज्यातील सरकारने शेतकऱ्यांचा विश्वासघात केला आहे असा आरोप देखील राजू शेट्टी यांनी केला. आमचे सरकार सत्तेवर आले तर शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू अशी घोषणा निवडणुकीच्या दरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी केले होते, मात्र हे आश्वासन आता हवेत विरले आहे. या अर्थसंकल्पात त्याची कोणतीच तरतूद झालेली नाही, तर दुसरीकडे शेतकऱ्यांना ठिबक सिंचनासाठी तीन वर्षापासून अनुदान मिळालेले नाही.
निवडणुकीच्या काळात प्रत्येक हमी पिकाला हमीभाव देऊ असे आश्वासन महायुतीने दिले. प्रत्यक्षात कांद्याच्या निर्यतीवर मात्र केंद्र सरकारने 20 टक्के आयात शुल्क लावले. देशात पुरेसे डाळ उत्पादन असतानाही परदेशातून डाळ आयात केली. त्यामुळे तुरीचे आणि सोयाबीनचे भाव गडगडले. सोयाबीनला हमीभाव असतानाही 9000 वरून 3800 रुपयापर्यंत भाव घसरले. कापसाचे ह तसेच वांदे झाले. शेतकऱ्यांच्या या आर्थिक कोंडीमुळे शेतकरी आत्महत्या वाढत आहेत असा आरोप राजू शेट्टी यांनी केला.











