डॉ. संदेश शहा, इंदापूर
जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळा पंढरपूर ते देहू परतीच्या मार्गावर परंपरेप्रमाणे चालणार असल्याचे देहू संस्थान विश्वस्त बैठकीत मान्य करण्यात आले. यासंदर्भात जगद्गुरु तुकाराम महाराज पालखी सोहळा प्रमुख व संत तुकाराम महाराज यांचे वंशज ह.भ.प.श्री. पुरुषोत्तम महाराज मोरे देहूकर यांनी आजरेकर फडाचे अध्यक्ष ह. भ. प हरिभाऊ बोराटे यांना थेट आश्वासन दिल्याने इंदापूरकरांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
यासंदर्भात इंदापूरच्या वारकरी शिष्टमंडळाने केलेली मागणी जगतगुरु श्रीमंत संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज संस्थान देहू यांच्याकडून बैठकीत मान्य करण्यात आल्याने वारकऱ्यांनी संत निळोबाराय यांचा अभंग म्हणत आनंद व्यक्त केला. संत निळोबाराय म्हणतात…
पूर्ण केला पूर्ण केला । पूर्ण केला मनोरथ
घरा आले घरा आले । घरा आले कृपाळू .
जगद्गुरु श्रीमंत श्री तुकाराम महाराज संस्थान देहू यांच्याकडून राज्यातील सर्व वारकऱ्यांच्या वारी व इतर ठिकाणी येणाऱ्या अडचणी, समस्या जाणून घेण्यासाठी श्री संतश्रेष्ठ तुकाराम महाराज संस्थान, देहू कार्यालयामध्ये समस्त वारकरी व वारकरी फडाचे प्रमुख, इतर शिष्टमंडळे यांची बैठक आयोजित केली होती.
या बैठकीमध्ये इंदापूर च्या जगद्गुरु श्रीमंत तुकाराम महाराज परतीचा पालखी सोहळा यामध्ये झालेला बदल मान्य करून संस्थानने भक्तांच्या भावना लक्षात घेऊन इंदापूरची परंपरेनुसार परतीच्या पालखीची मागणी मान्य करण्यात आली. यावेळी पालखी सोहळा प्रमुख अध्यक्ष, संत तुकाराम महाराज यांचे वंशज ह.भ.प.श्री. पुरुषोत्तम महाराज मोरे देहूकर, प्रमुख विश्वस्त ह. भ. प श्री. माणिक महाराज मोरे देहूकर, ह. भ. प श्री. भानुदास महाराज मोरे देहूकर, ह. भ प. श्री. दिलीप महाराज मोरे देहूकर, यांच्यासह श्री गुरु बाबासाहेब आजरेकर फडाचे प्रमुख श्री गुरु हरिदास (काका ) रामभाऊ बोराटे महाराज उपस्थित होते.
या मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये झालेल्या संस्थानच्या बैठकीमध्ये इंदापूरच्या मार्गाचा ठराव मंजूर झाला. त्यामुळे इंदापूरच्या परतीच्या मार्गामध्ये येणाऱ्या अडचणी कायमची दूर करण्यात येईल असे आश्वासन देहू संस्थानकडून श्री गुरु बाबासाहेब आजरेकर फडाचे प्रमुख श्री गुरु हरिदास काका माऊली बोराटे यांना देण्यात आले. त्यामुळे ह.भ.प दत्तात्रय गुजर, खुशाल कोकाटे महाराज यांनी आनंद व्यक्त केला. संस्थानच्या या निर्णयाचे माजी उपनगराध्यक्ष भरत शहा, कृष्णा ताटे, बाळासाहेब मोरे यांनी स्वागत केले.











