बारामती : महान्यूज लाईव्ह
दौंड तालुक्यातील पाटस येथील महिला शेतकरी कल्पना पानसरे यांना ग्रामपंचायत सदस्यांनी शेतात घुसून पिस्तूलचा धाक दाखवून मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिली, तसेच राजेंद्र झेंडे यांचे स्वमालकीचे लोखंडी पत्र्याचे दुकान सरपंच व तिचे पती तसेच इतर २० ते २५ जणांच्या बेकायदा जमावाने दुकानाची तोडफोड करून दुकान उध्वस्त केले. या घटनेच्या निषेधार्थ सोमवार पासून पाटस पोलीस चौकी समोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, पाटस येथील दलित महिला शेतकरी कल्पना अरुण पानसरे या शेतात काम करीत असताना दोन ग्रामपंचायत सदस्यांनी बाहेरील गुंड बोलावून शेतात प्रवेश करुन कल्पना पानसरे यांना पिस्तूलचा धाक दाखवून मारहाण केली. याबाबत यवत पोलीस ठाण्यात तब्बल १६ जणांवर ॲट्रॉसिटीसह गंभीर गुन्हे दाखल आहेत. मात्र पोलीसांनी अद्याप मुख्य आरोपींना अटक केली नाही.
तसेच पाटस येथील पत्रकार राजेंद्र झेंडे यांचे जुने तलाठी कार्यालयालगत कुटुंबांचे उदरनिर्वाह करणारे स्व मालकीचे लोखंडी पत्र्याचे दुकान सरपंच व तिचे पती तसेच इतर २० ते २५ जणांच्या बेकायदा जमावाने १२ फेब्रुवारीला कोणताही प्रशासकीय आदेश नसताना केवळ जातीय द्वेषातून आणि राजकीय सुडबुद्धीने तोडफोड करुन नुकसान करुन दुकानातील साहित्य व रोख रक्कम चोरुन नेऊन दुकान उध्वस्त करुन मोठं नुकसान केले आहे.
याबाबत यवत पोलीस ठाणे अंतर्गत असलेल्या पाटस पोलीस चौकीत तक्रार देऊन महिना उलटूनही अद्याप पर्यंत गुन्हा दाखल करण्यात आला नाही. या दोन्ही घटना केवळ जातीय द्वेषातून घडल्या आहेत. तसेच या दोन्ही गुन्ह्यातील व्यक्ती हे राजकीय असून त्यांना राजकीय वरदहस्त असल्याने यवत पोलीस संबंधित गुन्हेगारांना अप्रत्यक्षरित्या मदत करत आहेत व गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ करीत आहेत. त्यामुळे या जातीवादी गुन्हेगारांच्या आणि यवत आणि पाटस पोलीस प्रशासनाच्या निषेधार्थ पाटस पोलीस चौकी समोर सोमवारी (दिनांक १७) सकाळी १० वाजता पिडीत पानसरे आणि झेंडे कुटुंबासह लक्षणीय बेमुदत धरणे आंदोलन करणार आहे. असे निवेदनात म्हटले आहे.
यासंदर्भात दौंड तहसीलदार अरुण शेलार आणि दौंड उपविभागीय पोलिस अधिकारी तसेच दलित व बौद्ध राजकीय व सामाजिक संघटनांना रितसर निवेदन देण्यात आले आहे. दरम्यान, संबंधित गुन्हेगारांना पोलिसांनी त्वरित अटक करावी अशी मागणी दौंड तालुक्यातील आंबेडकर चळवळीतील विविध संघटनांनी केली आहे.











