बारामती : महान्यूज लाईव्ह
जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या, घातक शास्त्राचा वापर करून गावातील व्यापारी, व्यवसायिक, टपरीधारक आणि विक्रेत्यांना दमदाटी करून खंडणी मागणाऱ्या तीन जणांना माळेगाव पोलिसांनी संपूर्ण पुणे जिल्हा आणि सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील हद्दपार केले आहे. या निमित्ताने कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी माळेगाव पोलिसांनी दोन महिन्यात तब्बल सहा जणांना तडीपार केले आहे.
आता माळेगाव पोलिसांनी महेश उर्फ एक्का दत्तात्रय काशीद, सुरज उर्फ माऊली सोमनाथ काशीद (दोन्ही रा. मेडल, ता. बारामती)व इंद्रजीत माणिक सोनवणे (या. कऱ्हावागज, ता. बारामती) या तिघांना एक वर्षासाठी पुणे शहर, पिंपरी चिंचवड आयुक्तालयासह ग्रामीण जिल्हा आणि फलटण तालुक्यातून हद्दपार केले आहे. या तिघांविरोधात महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1991 च्या 1951 च्या कलम 55 अन्वये जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे प्रस्ताव सादर केला होता. पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी सखोल चौकशी करून या तिघा जणांना एक वर्षासाठी तडीपारीचा आदेश दिला.
या तिघाजणांच्या दहशतीमुळे सर्वसामान्य लोक, मजूर, नोकरवर्ग, व्यापारी, विक्रेते यांच्यामध्ये दहशत होती. त्यांच्या गुन्हेगारी प्रवृत्तीला वेळीच आळा बसावा आणि कायद्याचा धाक बसवण्यासाठी हा तडीपारीचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. दरम्यान ही कारवाई पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांच्या मार्गदर्शनाखाली माळेगावचे सहाय्यक निरीक्षक सचिन लोखंडे, प्रतिबंधक कारवाई विभागाचे फौजदार तुषार भोर, जालिंदर बंडगर, महेश बनकर, रामदास बनकर यांनी केली.











