ज्ञानेश्वर रायते, बारामती
पोलीस अधिकारी झाला की, सगळ्यांनी आपल्याला साहेबच म्हटले पाहिजे.. सगळ्यांनी आपल्याला सलामच केला पाहिजे, अशी जर प्रवृत्ती आणि वृत्ती असेल तर या लोकशाहीचा काय उपयोग? एखाद्या व्यक्तीला समोरच्या व्यक्तीचे नाव आणि पदनाम माहीत नसेल आणि चुकून तो व्यक्ती त्या व्यक्तीचे नाव घेत असेल, तर एवढं लाजायचं आणि माजायचं कारण काय? यवतमाळच्या आर्णी तालुक्यातील पोलीस ठाण्याच्या ठाणेदाराचे हे कृत्य सध्या राज्यभरात संताप आणतंय.
कॉम्प्युटर सायन्स मध्ये अभियंता असलेला धीरज गिराम हा नोकरी नसल्याने एका कंपनीमध्ये कुरिअर कंपनीमध्ये डिलिव्हरीचे काम करतो. काही दिवसांपूर्वी त्याच्या हातात एक कुरिअर पडलं. ज्याच्यावर नाव होतं केशव ठाकरे! आता हा केशव ठाकरे कोण? दिवसभर दीडविताच्या पोटासाठी धाव धाव धावणाऱ्या या धीरजला काय माहित, कोण किती मोठा?
त्यानं फक्त केशव ठाकरे का असं नाव विचारलं. कुरिअर वरती ज्या मोबाईल नंबरचा उल्लेख होता. त्या मोबाईल नंबर वर मोबाईल लावून त्याने पुढील व्यक्तीने फोन उचलताच केशव ठाकरे का? असं नाव विचारलं? यात त्याची काय चूक? पण पुढच्या केशव ठाकरे ला मात्र इगो हर्ट झाला. त्याने थेट आई बहीण काढली. सर, साहेब म्हणता येत नाही का? असे म्हणत त्याने त्याला शिवीगाळ केली.
आता खरोखरच या धीरज गिरामला समोरची व्यक्ती पोलीस अधिकारी आहे हे खरंच माहीत नव्हतं, हे या संभाषणातून दिसतं. मात्र पोलीस अधिकाऱ्याला आपण कोण आहोत, याचा मात्र विसर पडला. बरं फोनच्या संभाषणात फक्त शिवीगाळ करून तो थांबला का? नाही! त्यानं पुन्हा कुरिअरच्या ऑफिसमध्ये जाऊन धीरज गिरमच्या कानाखाली मारली.. पुन्हा शिवीगाळ केली.. तेव्हा कुठे त्याचा ईगो थंड झाला..! अर्थात धीरजच्या फोन पासून ते कुरिअर ऑफिस मधल्या मारहाणी पर्यंत फोनच संभाषण टेप झालं आणि कुरिअर ऑफिसमधलं सीसीटीव्ही फुटेज समोर आले म्हणून तरी धीरज गिरामची बिनचूक कामगिरी आणि या अधिकाऱ्याचा माज समोर आला..!
खरतर हा जो कोण कुठला केशव ठाकरे आहे, तो कोण आहे? फक्त एक जनसेवक आहे..! धीरज गिराम सारख्या अनेक सामान्य लोकांचा तो नोकर! जे लोक दिवसभर धावाधाव करून, पोटाला चिमटा घेऊन पैसे जमवतात आणि सरकारला कर भरतात, त्यांच्याच सकाळच्या टूथपेस्ट, साबण, चहापासून ते पेट्रोल, जेवण, रात्रीच्या मच्छर कॉइलपर्यंत खरेदी केल्या जात असलेल्या वस्तूंच्या करातून या माजोरड्यांना पगार मिळतो! अर्थात साधा, कोणतीही तक्रार नसलेला कुरियर बॉय, याला जर तो अशा शिव्या घालत असेल, तर त्याच्याकडे येणाऱ्या तक्रारदार अथवा आरोपी किंवा तत्सम कोणीही एवढेच काय चहा घेऊन येणाऱ्याचीही तो काय अवस्था करत असेल? सहज विचार करा!
आता हे राज्य शिवशाहीच राज्य आहे, असं महायुतीचे नेते वारंवार सांगतात. मग शिवशाहीच्या या राज्यात रयतेच्या भाजीच्या देठालाही हात लागू नये असा दंडक होता. महायुतीच्या राज्यात या माजोरड्या प्रवृत्तीचा माज मोडला जाईल का? पोलीस अधिकारी म्हणजे राज्यपाल आहे का? आणि जर पोलीस अधिकारी फार मोठा असेल, तर कुरिअर कंपनीकडे एखाद्या ऑनलाइन वस्तूची खरेदी करताना अगोदरच त्याने पदनाम त्यावर मुद्रित करावे, जेणेकरून समोरचा व्यक्ती अगोदरच त्याला लवून मुजरा करेल..! ठाकरे साहेब आहेत का? असे म्हणेल! प्रणाम ठाकरे साहेब असेही म्हणेल!











