बीड : महान्यूज लाईव्ह
परळी तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील अनेक कडे आता उलगडू लागले आहेत. एक गोष्ट सरळ समोर आली आहे ती म्हणजे वाल्मीक कराड हा येथील मुख्य सूत्रधार असल्याचे समोर आल्याने तोच खुनी असल्याचेही आता समोर आले आहे. या प्रकरणात अवादा कंपनीच्या खंडणी संदर्भाने सुदर्शन घुले आणि वाल्मीक कराड या दोघांमधील संभाषण देखील पोलिसांनी समोर आणले आहे.
7 डिसेंबर 2024 रोजी सुदर्शन घुले याने वाल्मीक कराडला फोन केला होता. त्यामध्ये वाल्मीक कराड हा सुदर्शन घुले याला म्हणतो की, उद्या जो तो उठेल आणि आपल्या आड येईल, तर आपण भिकेला लागू. असेच होत राहिले तर आपल्याला कोणतीही कंपनी खंडणी देणार नाही. त्यामुळे संतोष देशमुख अडवा येत असेल तर त्याला कायमचा धडा शिकवा…!
वाल्मीक कराडचा हा फोन कॉल आणि त्याची डिटेल्स पोलिसांनी आरोप पत्रात नमूद केले आहेत. संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात दाखल असलेल्या आरोप पत्रात पोलिसांनी याची नोंद केली असून अवादा एनर्जी कंपनीकडे दोन कोटी रुपयांची खंडणी वाल्मीक कराडने आणि त्याच्या साथीदारांनी मागितल्याचे समोर आले आहे. खंडणी दिली नाही तर पूर्ण बीड जिल्ह्यात आम्ही काम करू देणार नाही अशी धमकीही वाल्मीक कराडने दिली होती हेही आता समोर आले आहे.
अवादा कंपनीकडे खंडणी मागू नका. कंपनीच्या लोकांना काम करू द्या. माझ्या गावातील लोकांना त्यामुळे काम मिळत आहे असे संतोष देशमुख यांचे म्हणणे होते. मात्र संतोष देशमुख आडवे येत असल्याचे सुदर्शन घुले यांनी वाल्मीक कराडला या कॉल वरून सांगितले होते. गावातील लोकांना रोजगार मेळावा म्हणून खंडणी घेऊ नये असे सांगणाऱ्या संतोष देशमुख यांना त्यामुळेच टार्गेट करण्यात आले. त्यामुळे मंत्री धनंजय मुंडे यांचा जवळचा हस्तक असलेला वाल्मीक कराड आता थेट या प्रकरणात संबंधित असल्याचे समोर आले असल्याने धनंजय मुंडे यांच्या अडचणी वाढणार आहेत.











