पुणे : महान्यूज लाईव्ह
भाजपचा कार्यकर्ता देवेंद्र जोग यांना मारहाण केल्यानंतर भाजपचे नेते व केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी संताप व्यक्त केला होता. त्यानंतर मात्र पोलिसांनी गजा मारणेला शोधायला सुरुवात केली आणि गजा मारणे स्वतःहून कोथरूड पोलीस स्टेशनला हजर झाला.
पुणे शहरातील कोथरूड मधील भिलके नगर चौकात जोग यांना मारहाण करण्यात आली होती. ही मारहाण एवढी बेदम होती की, त्यांच्या पायाला आणि नाकाला गंभीर दुखापत झाली. गजा मारणेच्या गुंडांनी बेदम मारहाण केल्याने थेट मुरलीधर मोहोळ यांनी पुणे पोलिसांवर संताप व्यक्त केला होता. या घटनेप्रकरणी पुणे पोलिसांनी पाच पैकी तीन आरोपींना अटक केली होती. दोन आरोपी फरार आहेत, मात्र यामध्ये गजा मारणे याच्यावर देखील गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याला आता अटक करण्यात आली आहे.
दरम्यान या घटनेत अमोल विनायक तापकीर, किरण कोंडीबा पडवळ, ओम तीर्थराम धर्मजिज्ञासू या तिघांना पोलिसांनी अटक केली आणि आता गजा मारणेला अटक केली आहे. पोलिसांकडून असे सांगितले जात आहे की, गजा मारणेला अटक केल्यानंतर त्याला इतर गुन्हेगारांप्रमाणे फरशीवर खाली बसवले. त्याचे फोटो पोलिसांनी व्हायरल केले आहेत.
दरम्यान गजा मारणेवर आतापर्यंत 28 गुन्हे दाखल असून गजा मारणेवर आतापर्यंत तीन वेळा मकोका लावण्यात आला आहे. आता चौथ्यांदा पुणे पोलीस या टोळीस मकोका लावणार आहेत. यापूर्वी 2014 मध्ये दोन वेळा गजा मारणेला पोलिसांनी मकोका कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर सन 2022 मध्ये वकिलाकडून खंडणी मागितली म्हणून या टोळीवर मकोका लावण्यात आला होता.











