राजेंद्र झेंडे : महान्यूज लाईव्ह
राज्य सरकारने नुकताच एक निर्णय घेत शिव रस्ते व पानंद रस्ते खुले करण्याचे आदेश दिले आहेत याच आदेशाची अंमलबजावणी दौंड तालुक्यात झाली आहे तब्बल तेरा वर्षापासून अडवलेला व रखडलेला एक शिव रस्ता दौंडच्या महसूल विभागाने आज खुला केला.

रावणगाव मंडळ विभागातील नंदादेवी येथील शिवरस्ता 2012 पासून तब्बल तेरा वर्ष शेताच्या बांधावरील वादातून शेतकऱ्यांनी अडवला होता. मात्र हा रस्ता खुला करणे गरजेचे होते. राज्य सरकारच्या आदेशानुसार व जिल्हाधिकारी जितेंद्र दुडी यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय अधिकारी मिनाज मुल्ला व तहसीलदार अरुण शेलार यांच्या पुढाकाराने अखेर हा रस्ता खुला करण्यात आला.

यावेळी प्रत्यक्ष ठिकाणी महसूल नायब तहसीलदार डॉ. तुषार बोरकर, मंडळ अधिकारी महेंद्रसिंग भोई, ग्राम महसूल अधिकारी धनंजय डोंगरे, भूमी अभिलेखचे भुकरमापक राऊत तसेच फौजदार कुंभार यांच्या उपस्थितीत तब्बल 1 किलोमीटर शिवरस्ता खुला करून देण्यात आला. हा रस्ता खुला झाल्यामुळे या परिसरातील आजूबाजूच्या शेतकऱ्यांना शेतमाल नेण्यासाठी आणण्यासाठी तसेच पिके काढणीला आल्यानंतर त्यांची काढणी व्यवस्थित करण्यासाठी फायदा होणार आहे.












