बारामती : महान्यूज लाईव्ह
गुन्हे अन्वेषण विभागाच्या ग्रामीण शाखेने तालुक्यातील झारगडवाडी येथे जुगार खेळणाऱ्या अड्ड्यावर छापा टाकून अनिल माने यास अटक केली. त्याच्याकडून ४७ हजार ६१५ रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीत झारगडवाडी येथे काही व्यक्ती जुगार खेळत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यावरून स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने त्या ठिकाणी छापा टाकला. पोलिस निरिक्षक पद्माकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली अनिल काळे, रविराज कोकरे, ज्ञानेश्वर क्षीरसागर व त्यांच्या पथकाने ही कारवाई करीत या अड्ड्यावरून अनिल माने यास ताब्यात घेतले.
त्यावेळी त्याच्याकडून ४६ हजार ९१० रुपयांची रोख रक्कम हस्तगत करून त्या रकमेसह ४७ हजार ६१५ रुपयांचा ऐवज त्यांनी जप्त केला. संशयितास बारामती तालुका पोलिस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली.











