बारामती : महान्यूज लाईव्ह
बारामतीत कोरोना रोखण्यासाठी केलेेले आटोकाट प्रयत्न अपुरे पडल्यानंतर कोरोना वाढत गेला, कोरोनाबळींची संख्याही वाढली..पण जोडीला सामूहिक रोगप्रतिकार शक्ती व वैयक्तिक इच्छाशक्तीला बारामतीच्या वैद्यकीय व्यावसायिकांच्या कष्टाची जोड मिळाली आणि ३ हजारांवर आज कोरोनाचा आकडा पोचला, त्याचवेळी २ हजारहून अधिक जणांनी कोरोनावर मातही यशस्वीरित्या केली हा आकडा देखील मोठा असल्याचा दिलासाही मिळाला.
कोरोनामुक्ती.. बारामतीचा व्हिडीओ येथे पहा अथवा महान्यूज फेसबुक पेजवर पाहू शकता…
बारामतीत १५ जुलै रोजी ३ जण कोरोनाबाधित आढळले.. तेव्हापासून बारामतीत कोरोनाच्या संशयितांच्या तपासण्याही वाढल्या. तेव्हापासून बारामती तालुक्यात कोरोनाचे रुग्ण हळूहळू वाढत गेले. ही संख्या आज तीन हजारांवर पोचली. तीन हजार कोरोनाग्रस्त झाले असले तरी बारामतीत याच तीन महिन्यात २ हजार जणांनी कोरोनावर मातही केली आहे. आजअखेर बारामती तालुक्यात २ हजार ११२ जणांनी कोरोनावर मात केली आहे.
बारामतीत जसजसे रुग्ण वाढत गेले, तसतसे प्रशासनाने नॉन कोविड खासगी रुग्णालये कोविड केली. बारामतीत सरकारी दवाखान्यांनी प्रयत्नांची शिकस्त केली. त्यातून अगदी इंदापूर, कर्जत, बारामती तालुक्यातील रुग्णांना मोठा आधार मिळाला. सरकारी दवाखान्यात अगदी ९० वर्षाच्या आजोबांनीही कोरोनावर यशस्वीरित्या मात केली. तर खासगी दवाखान्यांमध्येही सुप्यापासून कर्जतपर्यंतच्या व फलटण रोडपासून मुंबईपर्यंतच्या कोरोनाग्रस्तांनीही कोरोनावर मात केली.
बारामतीतील कोरोनाबळींचा मृत्यूदर सुरवातीला खूप अधिक होता. अगदी तो १५ टक्क्यांपर्यंत पोचला होता. आज हा मृत्यूदर २.२९ टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. खासगी दवाखान्यांची वाढलेली रुग्ण उपचाराची मर्यादा यामुळे आता कोरोनाच्या रुग्णांना बरे होण्याचाही विश्वास मिळाला आहे. गावोगावच्या आरोग्य यंत्रणेने देखील गावातील रुग्ण निश्चित करण्यासाठी केलेली धावपळही महत्वाची ठरली.










