फलटणच्या गोविंद दूध डेरी प्रकल्प आणि बांधकाम व्यवसाय निमित्ताने आयकर विभागाने गेली पाच दिवस विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांचे चुलत बंधू संजीव राजे नाईक निंबाळकर व रघुनाथ राजे नाईक निंबाळकर यांची चौकशी केली तब्बल पाच दिवस संजीव राजे यांची चौकशी झाल्यानंतर आता रामराजे नाईक निंबाळकर यांचे व्हाट्सअप स्टेटस चर्चेत आले आहे.
रामराजे नाईक निंबाळकर यांनी, सुरुवात तुम्ही केली शेवट मी करणारच असा एक सुचक इशारा देणारे स्टेटस ठेवले आहे. हा इशारा फलटणमध्ये सुरू असलेल्या राजकारणाच्या संदर्भात आणि राज्यातील विशिष्ट नेत्यांच्या संदर्भात असावा असा कयास बांधला जात आहे. लोकसभेच्या निवडणुकीत रामराजे नाईक निंबाळकर हे तटस्थ होते. मात्र त्यांच्या कुटुंबीयांनी धैर्यशील मोहिते पाटील यांना निवडून आणण्यात मोठी भूमिका बजावली. त्याच राजकारणाचा हा भाग मानला जात आहे.
साताऱ्याच्या राजकारणात रणजीतसिंह नाईक निंबाळकर आणि जयकुमार गोरे रामराजे नाईक निंबाळकर यांना अडचणीत आणत आहेत आणि ते राजकीय वचपा काढत आहेत अशी नाईक निंबाळकर यांच्या समर्थकांमध्ये चर्चा आहे. त्यातच रामराजे नाईक निंबाळकर यांचे हे व्हाट्सअप स्टेटस या नेत्यांना इशारा आहे का? असा देखील प्रश्न उपस्थित होत आहे











