दौलतराव पिसाळ : महान्यूज लाईव्ह
वाई तालुक्यातील पांडवगडावर इंदापुर तालुक्यातील सहा जण फिरण्यासाठी आले होते परंतु अचानक मधमाशा खवळल्या आणि हजारो मधमाशा तुटून पडल्या. यात चार जण गंभीर जखमी झाले तर दोघे बेशुध्दावस्थेत होते. त्यांना तातडीने वाईच्या दवाखान्यात आणण्यात आले.
आज सकाळी सात वाजण्याच्या सुमारास पांडवगडावर ही घटना घडली. हजारो मधमाशा चावल्याने अल्हाद दंडवते, निखिल क्षीरसागर, गोपाळ आवटी, गोपाळकर दंडवते व इतर दोन बेशुद्धावस्थेत असल्याने नावे समजू शकली नाहीत. याची माहिती वाई पोलिसांना व वाई पंचायत समितीमधील वाई तालुका वैद्यकीय कक्षाला समजताच त्यांनी ५ रुग्णवाहिकांसह धाव घेतली.
वाई पोलिस ठाण्याचे हवालदार श्रीनिवास बिराजदार, डिबीचे विभागाचे नितीन कदम, कवठे प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉ. दिलिप भोजने, नरेंद्र सणस, सी.बी.जाधव, अजित चव्हाण, गीता वाठारकर या वैद्यकीय टीमने तातडीने ५ किलोमीटर डोंगर चढून घटनास्थळी पोहोचले. जखमींचा शोध घेऊन त्यांच्यावर प्राथमिक उपचार सुरू करून तब्बल पाच किलोमीटर पाऊलवाटेने खाली आणण्यात आले. पुढील उपचारासाठी त्यांना रुग्णवाहिकेतून वाईच्या ग्रामीण रूग्णालयात दाखल केले आहे.











