डॉ. संदेश शहा, इंदापूर
जगातील साखर बाजारातील बदलत्या धोरणानुसार जागतिक साखर बाजारपेठेत भारताची कायम महत्वपूर्ण भूमिका राहिली आहे. मात्र बदलत्या साखर धोरणासंदर्भात साखर उद्योगाने दक्ष राहिले पाहिजे. आगामी काळात भारत हा जागतिक बाजारपेठेत मजबूत राहण्यासाठी व्यापारातील बदलत्या परिस्थितीशी जुळवून घेण्यास सक्षम आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी केले.
पुणे येथे कॉफको इंटरनॅशनल व राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ नवी दिल्लीच्या सहकार्याने आयोजित शुगर कनेक्ट-२०२५ या परिसंवादामध्ये हर्षवर्धन पाटील बोलत होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश नाईकनवरे यांनी केले. यावेळी कॉफको इंटरनॅशनलचे साखर व्यापाराचे जागतिक प्रमुख जोस एडुआर्डो टोलेडो व मान्यवरांनी मनोगते व्यक्त केली.
श्री. पाटील पुढे म्हणाले, जागतिक साखर व्यापारामध्ये महाराष्ट्र राज्याची भूमिका देखील कौतुकास्पद राहिली आहे. सन २०२१-२२ च्या हंगामात भारताने ११० लाख मे. टन साखरेची विक्रमी निर्यात केली. तेव्हा ७० टक्के पेक्षा जास्त योगदान देऊन महाराष्ट्राने जागतिक साखर व्यापारात महत्वाची भूमिका बजावली आहे. साखर निर्यातीमधून चांगला फायदा मिळवण्यासाठी साखर कारखान्यांनी स्पर्धात्मक राहून उच्च गुणवत्ता राखण्यावर भर दिला पाहिजे. जागतिक बाजारातील मागणी अभ्यासपूर्णरित्या समजून घेऊन आणि त्यांची पूर्तता करून, साखर कारखाने भविष्यात निर्यातीच्या संधी वाढवू शकतात, असे अभ्यासपूर्ण मत हर्षवर्धन पाटील यांनी याप्रसंगी व्यक्त केले.
या परिसंवादामध्ये जगातील साखर व्यापारासंदर्भात दृकश्राव्य ध्वनीफितीव्दारे सादरीकरण करण्यात आले. यावेळी व्यापार चर्चा व प्रश्नोत्तर सत्र झाले. कॉफकोचे भारतीय उपखंडातील साखर विभागाचे प्रमुख रवी कृष्णमूर्ती यांनी आभार मानले.











