कुडाळ : महान्यूज लाईव्ह
चहात माशी पडली.. तो चहा बदलून द्या, नाहीतर मी पैसे देणार नाही असे पुण्याचा पर्यटक म्हणाला आणि कुडाळच्या झाराप झिरो पॉईंट येथे तनवीर करामत शेख याने व त्याच्या साथीदारांनी पुण्याच्या पर्यटकाला हातपाय बांधून कपडे फाटेपर्यंत मारले.
पुण्यातील रुपेश बबन सपकाळ या पर्यटकांच्या बाबतीत हा प्रकार घडला असून ते कात्रजचे रहिवासी आहेत. त्यांच्यासह त्यांचे मित्र संजय चव्हाण यांना देखील मारहाण करण्यात आली आहे. सपकाळ चव्हाण व त्यांचे मित्र हे कुडाळ तालुक्यात गेले होते. तेथे सकाळी सहाच्या वेळी झाराप झिरो पॉईंट येथे चहा पिण्यासाठी सगळे थांबले. तनवीर करामत शेख याचे हे हॉटेल होते.
त्याच्या चहाच्या कपात माशी पडली म्हणून रुपेश सपकाळ यांनी चहा बदलून द्या असे सांगितले. चहा बदलून दिला नाही तर पैसे देणार नाही असे ते म्हणाल्याने तन्वीर शेख याला राग आला. त्याने लागलीच खान मोहल्ल्यातील शराफत अब्बास शेख, अब्बास उर्फ साहिल शराफत शेख, परविन शराफत शेख, श्रीमती साजणी शराफत शेख, तलाह करामत शेख या सर्वांनी काठीने व हाताच्या ठोश्यांनी मारहाण केली. आणि कपडे फाडून त्यांचे हातपाय दोरीने बांधून लटकावून ठेवले.
ही घटना एका नागरिकाने 112 वर डायल करून पोलिसांना कळवली. त्यानंतर कुडाळचे सहाय्यक निरीक्षक ममता जाधव त्यांच्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी पोहोचल्या . तेव्हा सपकाळ यांना बांधलेल्या अवस्थेत त्यांनी पाहिले त्यांचे पाय उलटे दुमडून बांधले होते. सपकाळ यांना बांधलेल्या अवस्थेतून मुक्त केले. कुडाळ पोलिसांनी स्वतः फिर्यादी होऊन या संदर्भात फिर्याद दिली. कुडाळचे पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास फौजदार गणेश कराडकर करत आहेत.











