पुणे : महान्यूज लाईव्ह
ज्याच्या कपाळी टिळा नाही, त्याच्याकडून खरेदी नाही अशा वक्तव्याने काही काळापूर्वी चर्चेत आलेले तुकोबारायांचे अकरावे वंशज शिरीषमहाराज मोरे यांनी पाच फेब्रुवारी रोजी जेवण केल्यानंतर झोपायला म्हणून खोलीत जात गळफास घेऊन आत्महत्या केली. आर्थिक विवंचनेतून त्यांनी आत्महत्या केल्याची जरी प्राथमिक माहिती असली, तरी प्रत्यक्षात माझ्या जाण्यानंतर प्रत्येकाने दिलेले कर्ज फेडावे अशी अपेक्षा त्यांनी चिठ्ठीमध्ये व्यक्त केली असल्याने शिरीष महाराज मोरे यांचे आणखी एक वेगळेपण देखील समोर आले आहे.
शिरीष महाराज मोरे यांनी आत्महत्या का केली? याची चर्चा सध्या जिल्ह्यात सुरू आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते बनलेले शिरीष महाराज मोरे यांच्या निधनाने अनेकांना धक्का बसला. त्यांनी आत्महत्या पूर्वी एक चिठ्ठी देखील दिली. माझ्यामागे प्रत्येकाने दिलेलं कर्ज फेडावं असं म्हणून कोणावर अन्याय होणार नाही याची काळजी घेतली. शिरीष महाराजांनी मोफत कीर्तन सेवा केली. आज जिथे पैशावर कीर्तन केले जाते, पैशासाठी कीर्तन केले जाते आणि पैशाशिवाय कीर्तनच केले जात नाही अशी स्थिती असताना शिरीष महाराज मोरे यांचे उदाहरण मात्र वेगळे ठरते.
या घटनेनंतर नेमकं कर्ज किती आणि कशामुळं हे सगळं घडलं याची चर्चा सुरू झाली. यामध्ये जे मुद्दे समोर आलेत ते असे की.. ते हॉटेल क्षेत्रात उतरले होते. त्यांनी नादब्रह्म इडलीची फ्रॅंचाईजी घेतली होती. त्या अगोदर त्यांनी एक कर्ज उचलून कागदी पिशवी बनवण्याचा व्यवसाय सुरू केला. मात्र कोरोनाच्या काळात हा व्यवसाय बंद पडला. त्यांनी इडली साठी देखील कर्ज घेतले होते. एवढे कर्ज असतानाच त्यांनी घरही बांधले आणि चारचाकी गाडी देखील घेतली.
शिरीष महाराज मोरे यांनी चार चिठ्ठ्या लिहिलेल्या आहेत. यातील एक चिठ्ठी मम्मी पप्पा आणि दीदी यांच्यासाठी आहे. या ते म्हणतात.. काय लिहू मी? आयुष्यात जे जे करायचं म्हटलं, त्या प्रत्येक निर्णयात तुम्ही माझ्या पाठीशी उभे राहिला. लोकांना जे मिळवण्यासाठी कितीतरी वर्ष लागतात, ते तुमच्या पाठिंबामुळे काही वर्षातच मिळाले आणि मी इथवर पोचलो. आयुष्यात कधीच तुम्हाला माझ्यामुळे मान खाली घालावी लागली नाही, एवढे सुंदर आयुष्य जगलो. मला जन्म दिला. एवढं घडवलं. पाठीशी उभे राहिलात, पण नेमका जेव्हा मीच तुमच्या पाठीशी उभा राहिल पाहिजे, तेव्हाच मी तुमचा हात सोडून जातोय. कधी कधी सर्व मिळून सुद्धा एखादा माणूस युद्ध हरतोच. मीही थांबत आहे. मला माफ करा. तुम्हाला एकटे सोडून जातोय!
दुसरी चिठ्ठी पिनू, प्रियंका यांच्यासाठी आहे… या ते लिहीतात.. खरंतर तुझा आता कुठे हात पकडला होता. आपलं आयुष्य आता कुठे फुलायला सुरुवात झाली होती आणि मी जातोय. तुझ्यासोबत थोडा काळ घालवायचा होता. म्हणून तुला भेटून मग ही चूक करत आहे. मी हात जोडून माफी मागतो. माफ कर. आयुष्यात सर्वात जास्त मी अपराधी कोणाचा असेल, तर तुझा आहे. तुला न्याय देऊ शकलो नाही. माझ्या वाईट काळात तू माझ्यासोबत उभी राहिलीस. माझ्या प्रत्येक निर्णयात साथ दिलीस. मी हात सोडला तर माझी वाट पाहिलीस. माझ्या संघर्षात उभी राहणारी माझ्या सखे, तू माझ्या चांगल्या वेळेची हकदार होतीस. मला माफ कर. तुझी सगळी स्वप्न तोडून जातोय. कुंभमेळा राहिला.. वारी राहिली.. किल्ले राहिले.. भारत दर्शन राहीलं ..सगळच राहिलं..! मी काहीही न देता माझ्या झोळीत भरभरून दान टाकलं तू. तू खूप गोड आहेस. निस्वार्थी आहेस. खूप काही बोलता येईल. जर स्वतःला एवढा काळ थांबलीस आता मीच नसेल त्यामुळे थांबू नको. पुढे जा खूप मोठी हो. आणि हो, खूप झाले कष्ट, आता वर्क फ्रॉम होम घे. माझ्याकडून खूप वेळा खूप साऱ्या चुका झाल्या. मला माफ कर. तुझाच आहो..!
मित्रांसाठी देखील त्यांनी एक चिठ्ठी लिहिली आहे.. यात त्यांनी लिहिले आहे की, खरंतर सोडून जाणाऱ्या माणसाने मदत मागू नये, पण कृपा करून आई- वडिलांना सांभाळा. दीदीचं चांगलं स्थळ पाहून लग्न लावून द्या. खूप मोठा कर्जाचा डोंगर माझ्यावर आहे. तेवढा आई-वडिलांच्या डोक्यावरून उतरवा. कोणाचे किती आहेत हे वडिलांना माहिती आहे. तरीसुद्धा इथे लिहीत आहे. हे मी सुद्धा फेडू शकलो असतो, हे सुद्धा वाटत असेल पण ताकद नाही आता लढण्याची. माफ करा मला आणि हो आमची नवरी बाई, तिची सगळी स्वप्न उद्ध्वस्त करून मी चाललो आहे. खूप गोड आहे प्रियंका. तिला कधी वेळच देता आला नाही. तिच्यासाठी चांगला मुलगा बघा. नाहीतर ती लग्न करणार नाही. हात जोडून माफी मागतो!











