वालचंदनगर : महान्यूज लाईव्ह
गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने सायबर गुन्हेगारांची गुन्हेगारी वाढली आहे. विशेषतः मोबाईल वरील डिजिटल उपकरणांचा आधार घेत मोबाईल हॅक करत मोबाईल मधूनच बँकांची खाती रिकामी करण्याचे उद्योग वाढले आहेत. आयुष्यभराची जमवलेली पुंजी देखील एका क्षणात गायब होत असल्याने लोक धास्तावले आहेत. आणि याचे लोण आता गावागावात पोहोचले आहे.
वालचंदनगरचे ग्रामपंचायत सरपंच कुमार गायकवाड यांना दोन दिवसांपूर्वी असाच फटका बसला. सोमवारी गायकवाड यांनी वालचंदनगर पोलिसांकडे या संदर्भात तक्रार दाखल केली. जंक्शन मधील एका राष्ट्रीयकृत बँकेत गायकवाड यांचे खाते आहे. या खात्यातून एक फेब्रुवारी रोजी रात्री साडेबारा ते एक वाजण्याच्या दरम्यान त्यांच्या मोबाईल वरून सहा वेळा प्रत्येकी दहा हजार रुपये डिबेट झाले.
हे पैसे डिलीट होत असताना कोणताही ओटीपी किंवा कोणताही मेसेज गायकवाड यांच्या मोबाईलवर आला नाही. हे पैसे google पे च्या माध्यमातून दुसऱ्याच व्यक्तीच्या बँक खात्यामध्ये जमा झाले. त्यावरून गायकवाड यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. या घटनेचा तपास सहाय्यक निरीक्षक राजकुमार डुणगे करत आहेत. दरम्यान नागरिकांनी अनोळखी मोबाईल क्रमांकावरून येणारे कॉल घेऊ नयेत अथवा कोणतीही एपीके फाईल किंवा लिंक ओपन करू नये आणि वैयक्तिक माहिती देऊ नये अशा स्वरूपाचे आवाहन पोलिसांनी केले आहे.











