ज्ञानेश्वर रायते, बारामती
मुंबई हैदराबाद या बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी नॅशनल हायस्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेड ने प्रकल्प सादर केला. यावेळच्या अर्थसंकल्पामध्ये याविषयी काही तरतूद होण्याची शक्यता होती, मात्र प्रत्यक्षात त्याची काही घोषणा झालेली नाही. 711 किलोमीटर लांबीची अंतराची असलेली मुंबई हैदराबाद प्रस्तावित बुलेट ट्रेन अजूनही चाचपणीच्याच अवस्थेत आहे.
नवी मुंबई मार्गे लोणावळा, पुणे, दौंड, बारामती, अकलूज, पंढरपूर, सोलापूर, गुलबर्गा, विकाराबाद अशी स्थानके असलेल्या या प्रस्तावित बुलेट ट्रेन ला यावेळचा अर्थसंकल्पात मान्यता मिळेल व निधीची तरतूद होईल अशी अपेक्षा होती, मात्र मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्प अडचणीत असताना अजून या नव्या प्रकल्पाविषयी चर्चाच नाही.
यावेळच्या 2025 च्या अर्थसंकल्पामध्ये मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी 4004 कोटींची तरतूद नव्याने केली आहे. सन 2015 मध्ये जपानच्या मदतीने होणारा हा मुंबई अहमदाबादचा बुलेट ट्रेन प्रकल्पाचा पायाभरणीचा कार्यक्रम दहा वर्षानंतरही अजून पायातच आहे.
मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन चा प्रकल्प सध्या कामाच्या तयारीत असून तब्बल 508 किलोमीटर लांबीचा हाय स्पीड रेल कॉरिडॉर यासाठी उभारला जाणार आहे. बारा स्थानके आणि 320 किलोमीटर प्रतिताशी वेग या हायस्पीड रेल्वेचा असणार आहे. मात्र त्याचवेळी दुसरीकडे मुंबई हैदराबाद रेल्वेच्या कामाचा मुहूर्त कधी? हा प्रश्न मात्र कायमच आहे.
मुंबई हैदराबाद बुलेट ट्रेन साठी अनेक ठिकाणी सर्वेक्षणे करण्यात आली. या सर्वेक्षणानंतर अनेक ठिकाणी सामाजिक सर्वेक्षण देखील करण्यात आले, मात्र त्यानंतर पुढे काहीच घडलेले नाही. कारण या बुलेट ट्रेन साठी तब्बल 1198 हेक्टर जमीन संपादित करावी लागणार आहे. सध्या मुंबईवरून हैदराबादला जाण्यासाठी रेल्वेच्या आणि रस्त्याच्या प्रवासालाही 12 ते 14 तास लागतात. हे अंतर कमी करण्यासाठी बुलेट ट्रेन प्रस्तावित करण्यात आली आहे.











