तुम्हाला गेल्या काही दिवसांपासून ही लक्षणे असतील तर सावधान! बारामतीतील मेहता मेडिकेअर मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल व भारतीय जैन संघटनेने तुमच्यासाठी मोफत कर्करोग निदान तपासणी व शस्त्रक्रियेचे शिबिर आयोजित केले आहे!
बारामती : महान्यूज लाईव्ह
तुमच्या आवाजात अचानक बदल झाला आहे का? आवाज घोगरा झाला आहे का? स्तनात गाठ निर्माण झाली आहे का? त्यातून रक्तस्त्राव होतो आहे का? मासिक पाळीमध्ये अतिरिक्त रक्तस्त्राव होत असेल, तर त्याचप्रमाणे तोंडात पांढरे लाल चट्टे किंवा सातत्याने तोंडामध्ये जखम असण्याची लक्षणे तुम्हाला असतील, तर तुम्ही वेळीच सावधान व्हा! अगदी एवढेच नाही तर तुमची भूक कमी झाली असेल, तुम्हाला कावीळ झाली असेल, लघवीला अडथळा होत असेल किंवा या व्यतिरिक्त कोणताही आजार हा औषधोपचार घेऊनही तीन महिन्यात बरा होत नसेल तर ती कॅन्सर ची लक्षणे असू शकतात!मेहता मेडिकल स्पेशलिटी हॉस्पिटल व भारतीय जैन संघटनेच्या वतीने मोफत कर्करोग तपासणी व उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या 4 फेब्रुवारी व 5 फेब्रुवारी दरम्यान दररोज सकाळी दहा ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत बारामतीतील मेहता मेडिकेअर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल अँड आयसीयू यामध्ये हे शिबिर सुरू राहणार आहे अशी माहिती हॉस्पिटलचे प्रमुख डॉक्टर विशाल मेहता व भारतीय जैन संघटनेचे पुणे जिल्ह्याचे सदस्य निखिल मुथा, पंकज गादिया, सचिन बोगावत, हर्षल भटेवरा व वीरेश छाजेड यांनी दिली आहे.
अलीकडच्या काही वर्षांमध्ये कर्करोगाचे रुग्ण मोठ्या संख्येने वाढले आहेत. कर्करोगाचे प्रमाण देखील अत्यंत वेगाने वाढत आहे. त्यातही महिलांमधील कर्करोग हा लगेच समजून येत नाही त्यामुळे वेळीच त्याची तपासणी व निदान केल्याने या कर्करोगावर मात करता येऊ शकते, अशी अनेक उदाहरणे असल्याने भारतीय जैन संघटनेने पुढाकार घेत मेहता मेडिकेअर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या सहकार्याने हे शिबिर आयोजित केले आहे.
या शिबिरात तोंडाचा कॅन्सर, घशाचा कॅन्सर, स्तनाचा कॅन्सर, गर्भाशयाचा कॅन्सर, किडनी, मूत्राशय, प्रोस्टेट ग्रंथीचा कॅन्सर, आतड्याचा कॅन्सर व इतर लक्षणाद्वारे निदान केला जाणारा कॅन्सर यांची तपासणी केली जाणार आहे. या शिबिरादरम्यान लक्षणे आढळल्यास निष्णात कर्करोग शलचिकित्सकांद्वारा मोफत मार्गदर्शन आणि शस्त्रक्रिया केली जाणार असून सोनोग्राफी, एमआरआय, सिटीस्कॅन वर विशेष सवलत दिली जाणार आहे. त्याचबरोबर इतर प्रयोगशाळांच्या तपासणीवरही सवलत दिली जाणार आहे.











