भवानीनगर : महान्यूज लाईव्ह
पुण्यापाठोपाठ बारामती आणि बारामतीपाठोपाठ इंदापूर अशी आता कोयता गॅंगची माळ लागली आहे. गेल्या काही दिवसांपासून सातत्याने मिसरूड न फुटलेल्या पोरांची जीव घेण्यापर्यंत मजल जात असल्याने आता खरोखरच यावर जर कठोर कारवाई झाली नाही, तर गावागावात आणि वाड्यावस्त्यांवर देखील एकमेकांचा जीव घेण्याचे लोण पोचण्याची शक्यता आहे.
आज शुक्रवारी सकाळी 11 ते साडे अकराच्या दरम्यान भवानी नगरच्या महाविद्यालयापासून काही अंतरावर असलेल्या भवानीमातेच्या मंदिरासमोर अचानक दोन गटात हाणामारी झाली. ही हाणामारी एवढी क्रूर होती की कोयत्याने एका जणाच्या डोक्यात बेछुटपणे वार केले.. ही घटना पाहून बाजारपेठेत असलेले पालक देखील हादरून गेले.
पाहता क्षणी अंगावर काटा येईल अशा पद्धतीने ही मारामारी झाली. एकूणच बारामती मधील काही घटना किंवा पुण्यातील काही घटना आणि आता इंदापूर तालुक्यातील या घटना लक्षात घेता पोरांना कशाचीच भीती आणि धाक उरलेला नाही. अंगावर वार झाल्यानंतर तातडीने एका जणाला दवाखान्यात नेण्यात आले मात्र याचवेळी आता तर मर्डर करणार.. अशा वाक्यांचे फोन सुरू झाले होते. मुला मुलांमध्ये गॅंगवॉर होऊ लागल्याने पोलिसांनी अतिशय गांभीर्याने व अधिक कठोरपणे हे वेळीच थांबवण्याची आवश्यकता असल्याचे मत पालकांनी व्यक्त केले आहे.











