भवानीनगर : महान्यूज लाईव्ह
येथील श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या संचालकांकडून कारखान्याच्या शेतकी विभागातील कर्मचाऱ्याची कॉलर पकडून त्याला शिवीगाळ केली. दरम्यान सर्व कर्मचाऱ्यांनी या प्रकरणाचा निषेध करत काम बंद आंदोलन करण्याचा पवित्र उचलला.
कारखान्याच्या विद्यमान संचालकांनीच केलेल्या या प्रकाराचा कामगारांनी निषेध व्यक्त केला. कारखाना हा सभासदांच्या मालकीचा असून संबंधित कामगारही सभासद आहे. मात्र खोडवा ऊस तोडण्यासाठी शिवीगाळ करत, कॉलर पकडण्यापर्यंतचा प्रकार घडल्याने कामगार अस्वस्थ आहेत. कारखाना सुस्थितीत चालवण्याची जबाबदारी संचालक मंडळावर असते, मात्र संचालकांनीच ऊस तोडण्यासाठी केलेला प्रकार चर्चेचा विषय ठरला आहे.
मागील महिन्यापूर्वीही कारखान्याच्या शेतकी विभागातीलच प्रमुख अधिकाऱ्यास अशा प्रकाराला सामोरे जावे लागले होते. मात्र आता कर्मचारीही सुरक्षित नसल्याची भावना कामगारांमधून उमटत आहे. दरम्यान शेती कार्यालयात कामगारांनी आंदोलन केले.











