सुरेश खोपडे, निवृत्त आयपीएस अधिकारी, बारामती.
मस्साजोग परळी निर्घृण हत्येच्या घटनेवरून महाराष्ट्रातील घराणेशाही मोठ्या प्रमाणावर चर्चेला आलेली आहे. प्रत्येक जिल्ह्यात थोड्याफार प्रमाणात आढळणारी अशी राजकीय घराणेशाही निर्माण होण्यामागील प्रेरणा काय असावी बरे? हिमालयातील लंगूर माकडावर संशोधन करून ” लंगूरस ऑफ हिमालया” या नावाने एकाने आपले संशोधन प्रसिद्ध केले. त्याच संशोधनावर आधारित ” सत्तांतर ” या नावाने व्यंकटेश माडगूळकर यांनी पुस्तक प्रकाशित केलेले आहे.
काही माकडांच्या टोळ्यांचा खूप जवळून अभ्यास केला तेव्हा त्यांच्या लक्षात आले की, टोळीमध्ये काही नर बालक माकडांची मुंडी पिरगळून हत्या केली जात होती. कोण होते हे शिशु माकड? संशोधनात त्यांना आढळून आले की, प्रत्येक माकडाच्या टोळीमध्ये एक प्रमुख हुप्प्या नर माकड असे. त्या टोळीतील सर्वांना संरक्षण देण्याचे, टोळीत शिस्त राखण्याचे, टोळीसाठी अन्न देऊ शकणारे जगण्यासाठी आवश्यक असलेले ठिकाण शोधण्याचे काम या हुप्प्याकडे असे.
त्याचबरोबर टोळीतील प्रत्येक मादीबरोबर संबंध ठेवण्याचे काम तोच करत असे. त्यातील काही मादी माकडे इतर टोळीतील नराशी संबंध ठेवून पिल्लांना जन्म देत असत. त्यातील नर पिल्ले हा हूप्प्या नर माकड लहानपणीच मारून टाकत असे. काय हेतू होता? फक्त आपल्याच रक्ताची /वंशाची /जीनची पिढी कायम राहावी, टोळीचे नेतृत्व करावे व इतर नष्ट व्हावी.
हा सुप्त हेतू प्रत्येक सजीवांमध्ये असतो. ही खरे तर प्राणी प्रेरणा आहे. चिंपांजीपासून उत्क्रांत झालेला मानव त्याला अपवाद कसा असेल? घराणेशाही ही प्राणी प्रेरणा आहे. अशा घराण्यांतील हुप्प्यानी आपल्या मतदारसंघातील किती होतकरू बालक नेत्यांची मुंडी मुरगळून आपल्याच घराण्यातील वंशाचे दिवे पुढे आणले? याचा प्रत्येक मतदाराने विचार केलेला बरा.
मानवी संस्कृतीमध्ये घराणेशाहीला अपवाद आढळलेला आहे. काही अल्पसंख्यांक जमातींनी घराण्याऐवजी जमातवाद जोपासून इतर जमातीवर वर्चस्व गाजवून त्यांचे शोषण केलेले आहे. भारतामध्ये जमातीचे श्रेष्ठत्व कायम राहण्यासाठी मनुस्मृती नावाचा ग्रंथ निर्माण करण्यात आला व त्याचेच आचरण करण्यासाठी अनेक हूप्पे प्रयत्न करीत आहेत.
या प्राणी प्रेरणेवर आधारित घराणेशाही व जमात शाहीला शह देण्यासाठी जगभरच्या समतावादी विचारवंतांनी लोकशाहीची मांडणी केली व ती भारतातही जाहीर झाली. दुर्दैवाने महाराष्ट्रात घराणेशाहीतील हुप्प्यांनी आपल्या मतदारसंघात उदयोन्मुख प्रतिस्पर्धी नरांच्या मुंड्या पिरगळून टाकल्या. स्वतः शिरजोर झाले. आता महाराष्ट्रात महाविकास आघाडी या नावानं तेच राजकीय मॉडेल कार्यरत आहे. तर दुसरीकडे मालक जमातशाहीतील याच हुप्प्याणी गुलाम जमात घराणेशाहीतिल हुप्प्यांना आपल्या पालखीचे भोई बनविले. अशा पद्धतीने बनवले गेलेले महायुती या नावानेही राजकीय मॉडेल महाराष्ट्रात सत्तेत आहे.
आम्ही मात्र दर पाच वर्षांनी बोटांना शाई लावून याच हुप्प्यांचा जयजयकार करत लोकशाही जिंदाबाद असे म्हणत राहतो. ही दोन्ही मॉडेल्स कालबाह्य झालेली आहेत, कारण “आम्ही भारताचे लोक we the people of india…”या
या हुप्प्यांना वेसण( checks and balances) घालू शकत नाही. या हुप्प्याना जबाबदार responsible उत्तरदायित्व answerable ठरविणे गरजेचे आहे. ते अवघड आहे पण अशक्य नाही.
मलाच फार अक्कल आहे असा माझा अजिबात दावा नाही. पण या दोन्ही कालबाह्य मॉडेलला पर्याय ठरवणारे “अठरा पगड मावळे शिवशाही ” हे मॉडेल आम्ही मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे.
बोलूया त्यावर यथावकाश!











