पुणे : महान्यूज लाईव्ह
पुणे शहरातील काही दवाखान्यांमध्ये अचानक दोन दिवसात तब्बल 24 रुग्ण जीबी सिंड्रोम आजारामुळे उपचारासाठी दाखल झाले असून त्यातील दोन जण व्हेंटिलेटरवर आहेत.
अचानक घडलेल्या या घटनेने प्रशासन आणि आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली असून, याचे कारण तपासले जात आहे. मात्र प्राथमिक निष्कर्षानुसार दूषित पाणी आणि अन्न या गोष्टी जीबी सिंड्रोम साठी कारणीभूत असल्याची माहिती मिळाली आहे. अर्थात असे असले तरी एकाच वेळी अनेक भागात हा प्रादुर्भाव कसा झाला? हा प्रश्न मात्र अनुत्तरित आहे.
पुण्यातील न्यूरॉलॉजिकल सोसायटी ऑफ पुणे या संस्थेने पुण्यात दाखल झालेल्या रुग्णांचे रक्त नमुने तपासले. यामध्ये मिळालेल्या निष्कर्षानुसार दूषित पाणी आणि अन्नामुळे जीबी सिंड्रोम झाल्याचे दिसून आले आहे.
मात्र पुणे शहराच्या बाहेरील म्हणजे ग्रामीण भागातील तब्बल 16 जण, पुणे जिल्ह्याच्या बाहेरील एक आणि पिंपरी चिंचवड महापालिकेच्या हद्दीतील दोन तर पुणे शहरातील पाच जण या आजाराचे रुग्ण आढळले आहेत. एकाच वेळी वेगवेगळ्या ठिकाणी अशा स्वरूपाचा अन्न आणि पाण्यामुळे प्रादुर्भाव कसा होऊ शकतो हा प्रश्न मात्र या निमित्ताने पुन्हा नव्याने पुढे आला आहे.
पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात गुइलेन बॅरे सिंड्रोमचे तब्बल 10 रुग्ण उपचार घेत असून त्या खालोखाल पुन्हा हॉस्पिटलमध्ये 5, काशीबाई नवले रुग्णालयात 4, भारतीय हॉस्पिटलमध्ये 3, तर सह्याद्री हॉस्पिटल व औंध येथील अंकुरा रुग्णालय येथे प्रत्येकी 1 रुग्ण उपचार घेत आहे. यातील दोन रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार काही रुग्णांच्या तपासणीमध्ये कॅम्पायलोबॅक्टर नावाचा जिवाणू आढळून आला आहे. हा जिवाणू दूषित पाणी आणि दूषित अन्नामुळे होतो यामुळे काही रुग्णांना या जिवाणूमुळे जीबी सिंड्रोम चा प्रादुर्भाव झाल्या असल्याची माहिती दिली जात आहे तर दुसरीकडे राष्ट्रीय विषाणू परीक्षण संस्थेने अद्याप अहवाल दिला नसून त्या अहवाला नंतर बऱ्याच गोष्टी निष्पन्न होण्याची शक्यता आहे.











