जेजुरी : महान्यूज लाईव्ह
जेजुरीजवळ एसटी बस आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला, यात पुरंदर तालुक्यातील पारगाव मेमाणे येथील बोरमाळ वस्तीवरील तिघा जणांचा मृत्यू झाला. या घटनेने पुरंदर तालुक्यावर शोककळा पसरली.
ही घटना 16 जानेवारी रोजी घडली. सासवड जेजुरी रस्त्यावर बेलसर फाट्या नजिक उड्डाणपूलाचे काम सुरू आहे. या ठिकाणी 16 जानेवारी रोजी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास रमेश किसन मेमाणे हे साठ वर्षीय बोरमाळ वस्ती येथील रहिवासी तसेच संतोष दत्तात्रय मेमाणे हे 40 वर्षीय आणि 65 वर्षीय पांडुरंग दामोदर मेमाणे हे तिघेजण रस्ता क्रॉस करत असताना एसटी बसने त्यांना धडक दिली.
दुचाकीवर हे तिघे होते आणि त्यांना धडक बसली. ही धडक एवढी जोराची होती की, दुचाकी काही अंतरावर फरफटत गेली. यामध्ये या तिघांचाही जागीच मृत्यू झाला. दरम्यान या घटनेनंतर तातडीने त्यांना दवाखान्यात नेण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. दरम्यान घटना घडत असताना बस चालकाने वेग कमी करून रस्त्याच्या पलीकडे बसण्याचा प्रयत्न केला. मात्र तोपर्यंत दुचाकी बसखाली अडकली होती.
एकाच वस्तीवरील तिघाजणांचा एकाच अपघातात मृत्यू झाल्याने सगळीकडे खळबळ उडाली त्यानंतर या ठिकाणी मोठी गर्दी जमा झाली होती. गावातही शोककळा पसरली. खासदार सुप्रिया सुळे यांनी या घटनेप्रकरणी शोक व्यक्त केला.











