बारामती : महान्यूज लाईव्ह
घटना बारामती तालुक्यातील सोमेश्वर नगर येथील.. हातावरची पोट असणाऱ्या परप्रांतीय 18 वर्षीय तरुणांच्या बाबतीत हा प्रकार घडला असून या प्रकाराने सारेच हळहळले आहेत. आज सकाळी बारामती तालुक्यातल्या सोमेश्वरनगर परिसरात ट्रॅक्टरला हात करून ट्रॅक्टरची लिफ्ट घेतल्यानंतर धावत्या ट्रॅक्टरवरून पडून एका अठरा वर्षांच्या तरुणाचा मृत्यू झाला.
बारामती तालुक्यात सोमेश्वरनगर नजीकच्या करंजेपूल वानेवाडी रस्त्यावर आप्पासाहेब जगतापनगर येथे ही घटना घडली. करंजेपूल येथे फर्निचरच्या दुकानात काम करणारा, परंतु मूळचा राजस्थानच्या जेसलमेर जिल्ह्यातील पोखरण तालुक्यातील पथरवडा गावचा सांगसिंग दीपसिंग हा 18 वर्षीय तरुण या घटनेत मृत्युमुखी पडला.
करंजेपूल परिसरातील एका ठिकाणी सांगसिंग हा फर्निचरचे काम करत होता. त्याला वाणेवाडी कडे जायचे होते. त्यामुळे रस्त्याने जाणाऱ्या एका ट्रॅक्टरला त्याने हात केला आणि तो ट्रॅक्टरवर बसून वाणेवाडीकडे निघाला होता, मात्र आप्पासाहेब जगतापनगर जवळ ट्रॅक्टर आला असता, त्याच्या तोल गेला आणि तो डांबरी रस्त्यावर पडला. डोक्यावर वर्मी घाव लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान या घटनेनंतर त्याला लिफ्ट देणारा ट्रॅक्टरचालक मात्र फरार झाला.
दीड विताच्या पोटासाठी स्वतःचं घरदार गाव सोडून दुसऱ्या राज्यात येणाऱ्या मजुराचा मृत्यु ज्यांनी पाहिला, त्यांच्या अंगावर काटा आला. ट्रॅक्टर वरून पडून तो डोक्यावर पडल्याने त्याच्या मेंदूला तीव्र जखम झाली आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. करंजेपूल पोलीस पुढील तपास करत आहेत.











