बारामती : महान्यूज लाईव्ह
बारामतीतील अंजनगावच्या कृषी धोरण 2020 अंतर्गत मंजूर झालेल्या वीज उपकेंद्राच्या उद्घाटनाच्या निमित्ताने उपमुख्यमंत्री अजित पवार व खासदार सुप्रिया सुळे एका व्यासपीठावर आले. दरम्यान याच कार्यक्रमावरून सुप्रिया सुळे यांनी नाराजी व्यक्त करत थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले होते. मात्र संध्याकाळी त्या या कार्यक्रमात सहभागी झाल्या आणि उद्घाटन पार पडले.
लोकसभा निवडणूक झाल्यानंतर एका प्रशासकीय बैठकीच्या निमित्ताने एकत्र आलेले अजित पवार व सुप्रिया सुळे आजवर एका व्यासपीठावर दिसले नव्हते. मात्र तालुक्यातील अंजनगावच्या या कार्यक्रमात मात्र दोघे एका कार्यक्रमात आले. दरम्यान कार्यक्रमाची पूर्व नियोजित वेळ ही संध्याकाळी चार वाजताची होती. त्यामुळे वेळेत पोहोचलेल्या सुप्रिया सुळे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार या कार्यक्रमाला पोहोचेपर्यंत प्रतीक्षा केली.
दरम्यान या कार्यक्रमाला पोहोचल्यानंतर अजित पवार यांनी या उपकेंद्राचे उद्घाटन केले. दरम्यान उद्घाटन झाल्यानंतर कोनशिलाचे अनावरण करताना एक लहान मुलगी दिसताच अजितदादांची तिला नाव विचारलं आणि कविता म्हणण्यास सांगितल्यावर या मुलीने थेट अजितदादांचेच गाणे म्हटले. यावेळी दादांनी हे अभ्यासातले गाणे नाही, असे म्हणताच सुप्रिया सुळे यांच्यासह उपस्थितांनी हसून दाद दिली.











