विक्रम वरे : महान्यूज लाईव्ह
बारामती : तालुक्यातील अंजनगाव येथील महावितरणच्या ३३/११ केव्ही उपकेंद्र व उमाजी नाईक सभागृहाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झाले. त्यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, आत्ताच मला पत्र एक दिलंय. एका भागात रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे चाललं आहे. जळगाव ते अंजनगाव या रस्त्याचंही डांबरीकरणाचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाच झालेलं असून दुरुस्ती करण्याच्या सूचना देण्यात याव्यात.
एक सांगतो, कामं तर दर्जेदार झालीच पाहिजेत. शेवटी कामं एकदाच होत असतात. ब्रिटिशांच्या काळात झालेली कामे शंभर शंभर वर्षे टिकली आणि आपली कामे २५ वर्ष टीकत नाहीत. कशाला कामे कॉन्ट्रॅक्टर घेतात? त्यांना कोण मागे लागलय का? की, कामे घ्या? करायचं असेल तर चांगलं करा ना काम. नाहीतर अशांना काळ्या यादीतच टाकणार आहे. आता काम पुढाऱ्यांच आहे का कुणाचं हे बघणार नाही. मला काही त्याच्याशी घेणं देणं नाही. कामं दर्जेदार करून द्या. असा इशाराच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कॉन्ट्रॅक्टरांना दिला.
पुढे बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, तुम्ही आठव्यांदा तुमच्या सगळ्यांचे प्रतिनिधित्व करण्याची संधीही बारामतीकरांनी दिली. प्रचंड मतांनी लाखांच्या मताने तुम्ही मला महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये पाठवलं. त्याबद्दल मतदारांचे आभार मानतो. कृतज्ञता व्यक्त करतो. आता माझी जबाबदारी वाढली आहे अधिकाऱ्यांनीही यामध्ये साथ देण्याची गरज आहे. स्थानिकांनी त्यांची जबाबदारी पार पाडली पाहिजे असेही उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.











