ज्ञानेश्वर रायते, बारामती
बारामती तालुक्यातील लोणी भापकर गावातील शेतकऱ्यांनी सहा वीजपंप चोरीला गेल्याची फिर्याद दिली, अन् पोलिसांनी 6 नाही तब्बल 18 वीजपंपांची चोरी उघड केली… पोलिसांनी सहा जणांना शोधून काढले.. मात्र त्यातील चोरीची धक्कादायक माहिती जी पुढे आली आहे, ती चिंताजनक आहे, वीज पंप चोरणारी बहुतेक सारीच शेतकऱ्याची मुले आहेत. ऑनलाइन रमीचा नाद लागला आणि त्यामध्ये भरकटलेल्या पोरांनी चक्क आपल्याच घरातील वीजपंप चोरल्याचे उघडकीस आले आहे. आतापर्यंत दारूच्या आहारी गेल्यानंतर घरातील काहीही वस्तू माणूस विकतो हे माहिती असलेल्यांना आता मिसरूड फुटलेली पोरं सुद्धा जाहिरातीत दाखवत असलेल्या रमीच्या खेळाला भुलून वाया चालली आहेत ही सगळ्यात मोठी चिंतेची बाब आहे.
बारामती तालुक्यातील लोणी भापकर व सायंबाची वाडी या गावातील तब्बल 18 वीज पंप चोरी करणाऱ्यांची टोळी वडगाव निंबाळकर पोलिसांनी शोधली आहे. याप्रकरणी पोलिसांनी तब्बल सव्वा तीन लाखांचा मुद्देमाल जप्त केला असून सहा जणांना अटक केली आहे. हे सहा जण स्थानिक व शेतकऱ्यांची मुले असल्याचे दिसून आले आहे. ऑनलाइन रमी च्या नादात या चोऱ्या झाल्याचे पोलिसांनी शोधून काढल्याने पालक देखील चिंतेत आहेत.
बारामती तालुक्यातील लोणी भापकर येथील पाच शेतकऱ्यांनी ऑक्टोबर 2024 ते जानेवारी 2025 पर्यंत सहा वीज पंप चोरीला गेल्याची फिर्याद वडगाव निंबाळकर पोलिसांकडे दिली होती त्यावरून पोलिसांनी शोध घेतला असता सहा जणांना ताब्यात घेतले दरम्यान या सहा जणांनी फक्त लोणी भापकर गावातीलच नाही तर साहेबाची वाडी या गावातीलही विहिरीवरील व विंधन विहिरीवरील पाणबुड्या वीज पंप चोरले असल्याचे उघडकीस आले.
या प्रकरणात वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनचे सहाय्यक निरीक्षक सचिन काळे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार तौफिक मणेरी, भाऊसाहेब मारकड यांनी गोपनीय माहितीच्या आधारे तपास केला आणि लोणीभापकर मधील ओंकार राजेश आरडे, महेश दिलीप भापकर, प्रथमेश जालिंदर कांबळे, निलेश दत्तात्रेय मदने व जळकेवाडी येथील अमोल लहू कदम या पाच जणांना ताब्यात घेतले.
त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी या वीज पंपांची चोरी केल्याचे कबूल केले आणि लोणीभापकर येथीलच कालिदास शिवाजी भोसले याला या वीज पंपांची विक्री केल्याची कबुली दिली. त्यावरून त्या सहा जणांना पोलिसांनी अटक केली. या चोरीच्या गुन्ह्यातील तब्बल 18 20 पंप पोलिसांनी हस्तगत केले असून तीन लाख 16 हजार रुपयांचा मुद्देमाल हे जप्त केला आहे.
ही कामगिरी पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सुदर्शन राठोड, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक सचिन काळे यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार राहुल साबळे, दिलीप सुतार, हवालदार अनिल खेडकर तौफिक मणेरी, महेश पन्हाळे, सूर्यकांत कुलकर्णी, भाऊसाहेब मारकड, सहाय्यक फौजदार बाळासाहेब कारंडे, सुनील बालगुडे हवालदार हृदयनाथ देवकर, पोपट नाळे, सागर चौधरी, आबा जाधव, सुरज धोत्रे, विजय शेंडकर, शाहूराज भोसले, नागनाथ परगे, विलास ओमासे, धनंजय भोसले, राजेंद्र सावंत, सोमनाथ ढाणे, भानुदास सरक, विकास ईटाळे, अरुण सोनवणे यांच्या पथकाने केली.











