डॉ. संदेश शहा, इंदापूर
इंदापूर तालुक्यात ज्वारीचा पेरा ३६ टक्क्यांपर्यंत पोहोचला नाही, मक्याला लागलेलघ लष्करी अळीची दृष्ट आणि शेतकऱ्यांचे धोक्यात आले कष्ट ही सध्याची परिस्थिती आहे. एकेकाळी ज्वारीचे कोठार म्हणून ओळखले जाणाऱ्या इंदापूर तालुक्यात फळपिके घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. यंदा ज्वारीचा पेरा चक्क ३६ टक्क्यांपर्यंत देखील न पोहोचल्याने हुरड्यावरच संक्रांत आली आहे, तर सरासरी पेक्षा जवळपास दोनशे टक्के पेरणी झालेल्या मक्याच्या पिकाला देखील लष्करी अळीची दृष्ट लागली असल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.
त्यामुळे यंदा शेतकऱ्यांची आर्थिक सालचंदी धोक्यात आली असून गरिबांची भाकरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ज्वारीच्या दरामध्ये निश्चित वाढ होणार असल्याचे संकेत आहेत. यंदा हुरडा पार्टीवर देखील प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. इंदापूर तालुका हा रब्बीचा तालुका म्हणून ओळखला जातो, मात्र नीरा, भीमा नद्या तसेच उजनी धरण पाणलोट क्षेत्र लाभलेला इंदापूर तालुका मागील दहा वर्षांपासून फळबागा विशेषतः द्राक्ष, पेरू, केळी, डाळिंबांसाठी प्रसिध्द आहे.
रब्बी हंगामातील प्रमुख पीक म्हणून दहा वर्षांपूर्वी ज्वारीचे नाव घेतले जात असे. मात्र ज्वारीची कमी उत्पादकता व मजुरांची कमतरता यामुळे गव्हासारख्या तुलनेने उत्पादनास सोप्या व कमी मजुरावर येणा-या पिकाकडे शेतकरी वळाले. धान्याच्या माध्यमातून कष्ट वाया जावू न देणारे मक्याचे पीक दुभत्या जनावरांच्या चाऱ्याचा देखील प्रश्न सोडवत असल्याने दुध उत्पादनाचा जोडधंदा करणारे शेतकरी मक्याचे पीक घेवू लागले.
पुढे शेतकऱ्यांनी फायद्यासाठी फळबागांच्या लागवडी खाली जास्त क्षेत्र आणले. त्यामुळे फळपिकांनी ज्वारीच्या क्षेत्रावर अतिक्रमण केल्याने ज्वारीच्या क्षेत्रात उत्तरोत्तर घट होऊ लागली. त्यामुळे एकेकाळी ज्वारीचे कोठार म्हणून ओळखले जाणारा इंदापूर तालुका ऊसाचे आगार म्हणून प्रसिध्द तर झाला, मात्र ऊसाला मिळणारा कमी दर पाहून शेतकरी आता फळपिकांकडे वळले असून आता इंदापूर तालुका हा फळपिकांचे आगार म्हणून ओळखला जात आहे.
तालुक्यातील रब्बी ज्वारीचे सरासरी क्षेत्र १२ हजार ७५९ हेक्टर असून, गेल्या वर्षी केवळ ४ हजार ७०० हेक्टरवर ज्वारीची पेरणी झाली होती. यंदाच्या वर्षी त्यामध्ये आणखी १०९ हेक्टरने घट झाली. ४ हजार ५९१ हेक्टर क्षेत्रावर ज्वारीची पेरणी झाली असून तिची टक्केवारी ३५.९८ अशी आहे. इंदापूर (८५५ हेक्टर), बावडा (१ हजार ५७१ हेक्टर), सणसर (९४९ हेक्टर) व भिगवण (१ हजार२१६) अशी पेरणीची वर्गवारी आहे.
यंदाच्या वर्षी १९७.४ टक्के पेरणी झालेल्या मक्याच्या पिकाला लष्करी अळीची दृष्ट लागली आहे. त्यामुळे या पिकावर संक्रात आली आहे. मक्याचे सरासरी क्षेत्र ७ हजार ३७७ हेक्टर असून तब्बल १४ हजार ५३६ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. सणसर परिसरात सर्वाधिक म्हणजे ४ हजार ९५९ हेक्टर, त्या खालोखाल बावडा (३ हजार ७३३ हेक्टर), इंदापूर (२ हजार ९३५ हेक्टर) व भिगवण (२ हजार ९०९ हेक्टर) अशी पेरणीच्या क्षेत्राची वर्गवारी आहे.
चाऱ्यासाठी मका (१४४.२८ टक्के) तर कडवळ (१९८.८९ टक्के) एवढ्या प्रमाणात पिके घेण्यात आली आहेत. त्यामुळे चाऱ्याची अडचण भासणार नाही.परंतू कणसेच आली नाहीत तर मोठ्या प्रमाणात पेरणी होवून ही मका उत्पादकांना आर्थिक नुकसानीस सामोरे जावे लागेल असे चित्र आहे. त्यामुळे लष्करी अळीचा वेळेत बंदोबस्त होणे आवश्यक आहे.
तालुक्यातील बागायती ज्वारी क्षेत्र पुढीलप्रमाणे : निमसाखर -(१६० हेक्टर), खोरोची-(१३० हेक्टर), निरवांगी (१२५ हेक्टर), रेडा – (१२० हेक्टर), सराफवाडी – (९५ हेक्टर). जिरायती ज्वारी – तरंगवाडी – ( ७२ हेक्टर), कळस – (७० हेक्टर), लाकडी – (६७ हेक्टर), गोखळी -(५५ हेक्टर), इंदापूर-(५१ हेक्टर).











