ज्ञानेश्वर रायते, बारामती
टोलचा झोल कसा आहे पहा.. बारामतीत गाडी अन् इंदापूरात टोल वसुली… विचारायला गेलं तर सगळी टोलवाटोलवी! अर्थात बारामतीची आणि भिगवणची सेम गाडी.. बऱ्यापैकी सेम नंबर.. फक्त बीबी च्या ऐवजी बीई एवढाच काय तो फरक! पण या गाडीचा आणि बारामतीतल्या मालकाचा काहीच संबंध नाही.. तरीही इंदापूरच्या सरडेवाडीच्या टोलनाक्यावर गाडी भिगवणची गेली म्हणे आणि टोल मात्र बारामतीच्या गाडीचा फाडला म्हणजे बारामतीच्या मालकाच्या खिशातून टोल वसूल झाला..!

आता यातली गंमत गाडीच्या क्रमांकाची आहे की, टोल यंत्रणेची? सारंच रंजक आहे. काही दिवसांपूर्वी उंडवडीच्या टोलनाक्यावर देखील असाच प्रकार घडला होता. आता बारामतीतील अभिनेते व उद्योजक राहुल जगताप ढाकाळकर यांच्या बाबतीत हा प्रकार घडला आहे. त्यांच्या गाडीचा नंबर आहे, एम एच 42 बीबी 1919! ही गाडी बारामतीतच होती. मात्र त्यांच्या गाडीचा 95 रुपये टोल इंदापूरच्या टोल नाक्यावरून 7 जानेवारी 2025 रोजी संध्याकाळी सहा वाजून 40 मिनिटांनी फाडला गेला.

जगताप यांना आश्चर्य वाटले की आपली गाडी तर बारामतीतच आहे मग टोल कस काय आपल्या खात्यातून काटला गेला? असे अनेक जणांच्या बाबतीत घडत आहे मात्र जगताप गप्प बसले नाहीत 95 रुपयांसाठी नव्हे तर अक्षम्यचुकीसाठी त्यांनी या टोलनाक्याशी पाठपुरावा चालू ठेवला आणि टोल नाक्यावरील यंत्रणेने त्यांच्या झालेल्या चुकीची वस्तूची लक्षात घेत दिलगिरी व्यक्त केली आणि ऑनलाईन 95 रुपये परत पाठवले.

आता गंमत तर पुढेच आहे. अगदी याच वेळी भिगवण येथील एम एच 42 बीई 1919 या क्रमांकाची गाडी येथून म्हणजे सरडेवाडीच्या टोल नाक्यावरून गेल्याचे फुटेज जगताप यांना मिळाले. महत्त्वाची गोष्ट म्हणजे ती देखील गाडी जगताप यांच्या गाडीच्या सारख्याच रंगाची, परंतु टोलनाक्यावरील कॅमेरा मध्ये बीई आणि बीबी यातला फरक कसा काय समाविष्ट झाला नाही? हे एक कोडेच आहे. त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे नंबर मध्ये फरक मोठा आहे हा कॅमेरा कसा दिसून आला नाही? अनेक मुद्दे आहेत. एकतर ही सायबर गुन्हेगारी आहे, मग ती टोलमालकाची असेल किंवा यंत्रणेची!











