नागपूर : महान्यूज लाईव्ह
मुले एकुलती एक असली की, आपण फार लाड करतो. मुलांना हे नको ते नको, हे पाहिजे ते पाहिजे, या साऱ्यांचं बघतो. मुलांचा उत्कर्ष झाला पाहिजे म्हणून पोटाला चिमटे घेत, प्रत्येक आईबाप आयुष्यभर संघर्ष करत असतात. जगण्याची लढाई लढत असतात.. पण हेच पुढचे गोळे आई-वडिलांच्या जीवावर उठत असतील तर? नागपूरच्या कोराडी भागातील ही घटना अंगावर काटा आणणारी अशीच आहे.
नागपूर मध्ये लीलाधर डाखुळे व अरुणा लिलाधर डाखुळे या पती-पत्नीची हत्या त्यांचाच मुलगा असलेल्या 24 वर्षाच्या उत्कर्ष डाखुळे याने केली. लीलाधर हे नागपूरच्या कोराडी पावर प्लांट मध्ये नोकरीला होते तर अरुणा या शिक्षिका होत्या. उत्कर्ष इंजिनिअरिंगचा अभ्यास करत होता तर त्याची बहीण बी ए एम एस ची विद्यार्थिनी होती. उत्कर्ष तब्बल सहा वर्ष नापास होत असल्याने घरात वाद होत होता. उत्कर्ष ला शेती करायला पाठवायचं असं ठरलं आणि तिथेच गाडं बिघडलं. त्याने बाजारात जाऊन चाकू विकत घेतला.
26 डिसेंबर ची घटना.. अरुणा या घरात असताना उत्कृष्ट बेडरूममध्ये चक्क जन्मदात्या आईची गळा दाबून हत्या केली. मग शांतपणे बेडरूमच्या दरवाजा बंद केला आणि तो वडिलांची वाट पाहत थांबला. वडील नातेवाईकांच्या अंत्यसंस्काराला गेले होते. वडील परतले तेव्हाही तो त्यांचीच वाट पाहत थांबला होता.
अंत्यसंस्कारावरून आल्यानंतर वडील बाथरूम मध्ये जात असताना उत्कर्ष याने त्यांच्या खांद्यावर चाकूने तीन वार केले. तरीही वडिलांनी त्याला समजावण्याचा प्रयत्न केला. तुला काय झाले आहे? असा प्रश्न त्यांनी केला. मात्र अतिशय हिंसक बनलेला उत्कर्ष ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. मग वडिलांनी त्याला थांब, आपण आईला बोलवू आणि आपण सगळे बसून तुझ्या मागण्यावर मार्ग काढू असे म्हणताच त्याने मी आईचा खून केला आहे असे शांतपणे उत्तर दिले आणि त्यानंतर लागलीच चाकूने भोसकले. वडिलांचा ही जागीच मृत्यू झाला.
वैद्यकीय शिक्षण घेणारी बहिण आता घरी येईल हे लक्षात येताच त्यांनी घराला कुलूप लावले. वडिलांचा फोन बंद करून स्वतःच ठेवला आणि चारचाकी वाहन घेऊन बहिणीला घ्यायला गेला. बहिणीला त्याने आई-वडील बंगळुरूच्या आश्रमात मेडिटेशनसाठी गेले आहेत, त्यामुळे आपल्या काकांकडे राहायला जावे लागेल असे सांगितले परंतु बहिणीला चिंता वाटली. तिने आई वडिलांच्या फोनवर फोन केले परंतु त्यांचा फोन बंद लागत असल्याने तिची चिंता वाढली.
तिची चिंता कमी करण्यासाठी उत्कर्ष ने आणखी एक प्लॅन केला. त्याने वडिलांचा मोबाईल सुरू करून बहिणीला व्हाट्सअप वर मेसेज टाकला आम्ही बेंगळूरूला आले असून पाच जानेवारीपर्यंत नागपुरात येऊ असा मेसेज बहिणीला मिळाल्याने बहिणीचाही विश्वास बसला.
इकडे मात्र घरातून दुर्गंधी येऊ लागल्याने शेजाऱ्यांनी उत्कर्षला फोन केला आणि तुझ्या घरातून दुर्गंधी येत असल्याचे सांगितले. त्यानंतर उत्कर्ष 31 डिसेंबर रोजी गावात आला आणि मला आई-वडिलांविषयी खूप खूप वाईट वाईट स्वप्न पडत आहेत असे सांगून आपण दरवाजा उघडू असे त्याने चुलत भावाला सांगितले. दरवाजा उघडताच वडिलांचा मोबाईल घरात टेबलवर ठेवून त्याने वडिलांनी आत्महत्या केली असेल असा बनाव केला.
एवढेच नाही, तर अगोदरच मोबाईलमध्ये एक सुसाईड नोट देखील त्याने लिहिली होती. त्यामध्ये ‘बाळांनो आम्हाला मिस करू नका. आम्ही हे पाऊल उचलतोय. पोलिसात तक्रार करू नका. आम्हाला थेट स्मशानभूमीत घेऊन जा अशी लिहिलेली सुसाईड नोट मोबाईलवर ठेवली होती. परंतु पोलिसांना संशय आला आणि त्यांनी उत्कर्षला ताब्यात घेतले.











