राजेंद्र झेंडे,महान्युज लाईव्ह
दौंड : दौंड तालुक्यातील कुरकुंभ औद्योगिक वसाहतीत अल्काईल अमाईन्स केमिकल कंपनीत शनिवारी पहाटे भीषण स्फोट झाल्याची घटना घडली. या स्फोटात कंपनीतील एक कामगार गंभीर स्वरूपात भाजल्या ने जखमी झाला आहे. सागर रणभावरे हा डिप्लोमा इंजिनिअर चा कामगार गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.
त्यास दौंड शहरातील खासगी रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुणे येथील खाजगी रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. शनिवारी (दि २८) पहाटे सहा ते साडेसहा वाजण्याच्या आसपास ही घटना घडली. हा स्फोट एवढा भीषण होता की, सकाळच्या वेळी परिसरात मोठा आवाज झाला आणि धुराचे लोट आकाशात उडाले.
अल्काईल अमाईन्स या कंपनीतील डिस्टीलेशन विभागात रिबॉयलर मधून रेसीड्यु ट्रान्सफर झाल्यानंतर टॅंक टी-४४२० ही 2000 लिटरची टाकी फुटून मोठा आवाज होऊन स्फोट झाला असल्याची प्राथमिक माहिती मिळाली. दरम्यान घटनेची माहिती मिळताच कुरकुंभ औद्योगिक सुरक्षा विभागाचे अधिकारी अंकुश खराडे, औद्योगिक सुरक्षा व आरोग्य विभागाचे उपसंचालक अखिल घोगरे, सुरक्षा अधिकारी अंकुश खराडे, दौंड पोलीस निरीक्षक गोपाळ पवार, कुरकुंभ पोलीस चौकीचे सहायक पोलिस निरीक्षक नागनाथ पाटील यांनी भेट दिली.
याबाबत सहाय्यक पोलीस निरीक्षक नागनाथ पाटील म्हणाले की, अल्काईल अमाईन्स केमिकल कंपनीत स्फोट झाला असून एक कामगार गंभीर जखमी आहे. यासंदर्भात दौंड पोलीस ठाण्यात अद्याप गुन्हा दाखल नाही.











