पुणे : महान्यूज लाईव्ह
पुणे जिल्ह्यातील राजगुरुनगरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे ज्यामुळे संपूर्ण परिसर हादरला आहे. बुधवारी दुपारी घराजवळ खेळत असताना अचानक बेपत्ता झालेल्या दोन लहान बहिणींचे मृतदेह रात्री शहराबाहेर एका इमारतीच्या बाजूला ड्रममध्ये छिन्नविछिन्न अवस्थेत आढळले आहेत. या हत्येच्या मागचा हेतू आणि घटनाक्रम आता पोलीस तपासात उघड झाला आहे.
राजगुरुनगर शहरातील वाडा रोड परिसरात दोन लहान बहिणी – आठ आणि नऊ वर्षीय दुर्वा आणि कार्तिकी मकवाने – काल दुपारी घराजवळ खेळत असताना अचानक बेपत्ता झाल्या. पालकांनी आणि आजूबाजूच्या लोकांनी त्यांचा शोध घेतला, मात्र त्या कुठेच आढळल्या नाहीत. रात्री 10:30 वाजता राजगुरुनगर शहराजवळ असलेल्या एका इमारतीच्या बाजूला एका पाण्याच्या ड्रममध्ये दोन्ही मुलींचे मृतदेह छिन्नविछिन्न अवस्थेत आढळले.
पोलीस तपासातून समोर आले आहे की, या दोन्ही मुलींची हत्या त्यांच्या शेजाऱ्यानेच केली आहे. घराच्या वरच्या मजल्यावर राहणारा 54 वर्षीय आचारी अजय दास हा आरोपी आहे. त्याने दोन्ही मुलींना गोड बोलून स्वतःच्या घरात आणले आणि सुरुवातीला एका बहिणीवर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला.
त्यावेळी एका बहिणीने विरोध केला आणि आरडाओरडा करण्याचा प्रयत्न केला, ज्यामुळे त्याने तिची हत्या केली. दुसऱ्या बहिणीने या घटनेची वाच्यता करू नये म्हणून तिचाही जीव घेतला. मृतदेहांची विल्हेवाट लावण्यासाठी त्याने त्यांना घराजवळच्या इमारतीजवळील ड्रममध्ये ठेवले.











