शिरूर : महान्यूज लाईव्ह
पिंपळसुटी (ता.शिरूर) येथे बिबट्याने लहान मुलीवर हल्ला केल्याने चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना मंगळवार दिनांक 24 रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास घडली. रक्षा अजय निकम (वय चार वर्ष राहणार पिंपळसूटी) असे दुर्दैवी मृत्यू झालेल्या चिमुकलीचे नाव आहे.
याबाबत सविस्तर असे की, पिंपळसूटी गावालगत नदीकिनारी भिल्लवस्ती आहे. या ठिकाणी निकम कुटुंबीय हे वस्त्या करून झोपडीत राहायला आहेत. मंगळवार दिनांक 24 रोजी सायंकाळी साडे सातच्या सुमारास आई घरासमोर मुलींना स्वयंपाक करत असताना घरात गेल्यानंतर अचानक घराजवळ दबा धरून बसलेला बिबट्या घराजवळ आला आणि त्याने चिमुकली वर हल्ला करून उचलून नेले.
यानंतर आईने आरडाओरड केली. स्थानिक युवकांना माहिती समजताच तत्काळ शेकडो युवक तसेच ग्रामस्थ घटनास्थळी धावत गेले. त्यानंतर परिसरात चिमुकलीचा शोध घेऊ लागले. सुमारे दोन तासानंतर शेजारील उसाच्या बाजूला चिमुकलीचा मृतदेह आढळून आला. यानंतर तात्काळ सदर मृतदेह युवकांनी वनविभागाच्या ताब्यात देण्यात आला.
दरम्यान मृतदेह मिळाल्यानंतर मुलीच्या आईने एकच टाहो फोडला. सदरची वस्ती ही नदीच्या कडेला असल्याने तिथे प्रकाश होता, मात्र तरीही बिबट्याने त्या ठिकाणी हल्ला केला व हा दुर्दैवी प्रकार घडला. सदर ठिकाणी मृतदेह शोधण्यासाठी स्थानिक लोकांनी मोठे परिश्रम घेतले.
दरम्यान मांडवगण फराटा या ठिकाणी गेल्या अडीच महिन्यांपूर्वी दोन चिमुकल्यांवर बिबट्याने हल्ला केला होता. त्यात दोन लहान मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. त्यानंतर ही घडलेली या परिसरातील तिसरी घटना आहे. मांडवगण फराटा, रांजणगाव सांडस या भागात वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात चार बिबटे जेरबंद झाले आहेत. मात्र मांडवगण फराटा या परिसरात अजूनही बिबट्याची दहशत कायम होती.
घटना घडल्यानंतर वन विभाग तत्काळ आला, त्यावेळी ग्रामस्थांनी मोठा रोष व्यक्त केला. मांडवगण फराटा, पिंपळसूटी, शिरसगाव काटा तसेच पूर्व भागात सातत्याने बिबट्याचे हल्ले वाढत आहेत. गेल्या काही दिवसांपासून बिबट्याने या भागात चांगले बस्तान बसवले आहे. त्यामुळे वन विभागाने त्वरित दखल घेऊन बिबटे पकडण्यासाठी ठोस उपाययोजना करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.











